वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना १० हजार फूड पॅकेट्सचं वाटप
मोहोळ/धुरंदर न्यूज
आजकाल वाढदिवस म्हणजे केक, पुष्पगुच्छ, लोकांची रेलचेल व पार्टी वैगरे असाच वाढदिवस साजरा करण्याचा सर्रास प्रघात आहे. पण भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी या समजुतीला छेद दिला आहे. समाजातील गरजू मुलांना १० हजार फूड पॅकेट्सचं वितरण करत विश्वराज यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. बुधवार दि. १७ मे रोजी विश्वराज महाडिक यांचा वाढदिवस कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात मोहोळ सह अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा करण्याची विश्वराज महाडिक यांची भूमिका निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
महाडिक परिवार व सामाजिक उपक्रम यांचं जणू जन्मजात बाळकडूच विश्वराज यांना मिळाले आहे. कुटुंबियांच्या संस्कारातून व प्रेरणेतूनच विश्वराज हे देखील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. गतवर्षी विश्वराज यांनी शेतीतील पहिल्या उत्पन्नातून भीमा परिवारातील सभासद व कार्यकर्त्यांना दिवाळी फराळाचं वाटप केले होते. इतकंच नाही तर घरापासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या ऊसतोड मजुरांची व त्यांच्या मुलांची दिवाळी गोड करत त्यांनी फक्त मनेच जिंकली नाहीत तर समाजापुढे एक आदर्श देखील घालून दिला आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपण्याकडे विश्वराज महाडिक यांचा कल असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळाले.
लहान मुलांच्या आवडीचे बर्गर, पिझ्झा, गुलाबजामून, फ्रेंच फ्राईज असे विविध दर्जेदार पदार्थ फूड पॅकेट्सद्वारे देण्यात आले. झोपडपट्टी व वसाहतींमध्ये राहणाऱ्या या मुलांपैकी अनेकांनी बर्गर पिझ्झा केवळ चित्रातच पाहिलेला होता. हातात फूड पॅकेट्स आल्यानंतर चिमुकल्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक या कार्याची पोहोचच म्हणावी लागेल. कोल्हापुर येथील राजेंद्रनगर, मोतीनगर, यादवनगर, सदरबझार, लक्षतीर्थ वसाहत, विक्रमनगर, अवनी संस्था व पंढरपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम, राम कृष्ण हरी वृद्धाश्रम, नवरंगे बालकाश्रम तसेच दत्तघाट अशा विविध ठिकाणी गरजू मुलांना या फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले.