भाजपाचे दशरथ काळे यांची निवेदनाद्वारे मागणी..
मोहोळ/धुरंदर न्यूज
मोहोळ येथील तहसीलदारांनी स्वतःच्या फायद्याकरीता शासनाच्या गाडीवर खाजगी चालक ठेवून शासकिय चालकाची नियुक्ती असतानाही त्याला बसुन पगार सुरू ठेवलेने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणेबाबत करवाई करण्याबाबतची मागणी भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष दशरथ काळे यांनी केली आहे.
याबाबत दशरथ काळे यांनी सोलापूर येथे उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना भेटून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तहसील कार्यालयाला तहसीदार यांच्याकरीता शासनाकडून बोलेरो गाडी क्र. एम एच १३ डीटी ६०८३ हे वाहन देण्यात आलेले आहे. या वाहनाकरीता शासकिय चालक म्हणून योगेश ज्ञानदेव अनंतकवळस यांची नियुक्ती केलेली असुन त्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेला आहे. अशी परिस्थिती असताना वरील क्रमांकाच्या शासकिय वाहनावरती मोहोळचे तहसिलदार प्रशांत बेडसे यांनी स्वतःच्या अधिकारात खाजगी चालक ठेवून शासकिय वाहनाचा गैर वापर केला आहे. वस्तुस्थितीमध्ये शासनाने शासकिय खर्चातुन चालक दिला असतानाही त्या चालकाला शासकीय गाडीवर काम करू न देता बसुन पगार दिली जात आहे. तरी सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवून मोहोळ तहसील व पोलीस ठाण्याच्या आवारात असलेले सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून याप्रकरणी तहसीलदार प्रशांत बेडसे यांची चौकशी करुन ज्या कालावधीपासून त्यांनी शासकिय चालकाला बसुन पगार दिला आहे. तो पगार तहसीलदार यांच्या पगारातून वसुल करुन शासनाकडे जमा करण्यात यावा. तसेच शासकीय वाहनांवर खाजगी चालक ठेवून त्याच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांमध्ये दडपशाही व गुंडगिरी मार्गाचा अवलंब केल्या प्रकरणी तहसीलदार प्रशांत बेडसे व खाजगी चालक यांच्यावर योग्य तो कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष दशरथ काळे यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह तालुका व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन करजोळे, पंचायतराज व ग्रामविकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोसले बाळासाहेब शिरसागर आदी उपस्थित होते.