सोलापूर/प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपाचे उमेदवार आमदार राम सातपुते विरुद्ध काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्यामध्ये प्रारंभी जनमानसात काँग्रेसने घेतलेली आघाडी टिकवण्यामध्ये शेवटच्या टप्प्यात त्यांना अपयश आल्याचे दिसत असून ग्रामीण भागामध्ये तर बूथ प्रचार यंत्रणामध्ये भाजपाची सरशी झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.
मराठा आरक्षणासह विविध समाजाची आरक्षणे, महागाई, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न यास्तव भारतीय जनता पार्टी वर नाराज असलेले नागरिक आपसूकच काँग्रेसकडे वळाल्याचे चित्र सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसून येत होते. व्हाट्सअप यूनिवर्सिटी मध्ये सोशल मीडियावर काँग्रेसच्या बाजूने पडणाऱ्या पोस्टचे मतांमध्ये रूपांतर करण्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांना अपयश होताना दिसत असून अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उबाठा यांच्याबरोबर समन्वय ठेवण्यामध्ये काँग्रेसच्या स्नेथानिक त्यांना जमले नसल्याचेही दिसून येत आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावत बूथ यंत्रणा सुरू असतानाही यामध्ये काँग्रेसला ग्रामीण भागामध्ये त्रेधतिरपीट उडाल्याचे दिसून येत असून याउलट गेल्या आठवड्याभरापासूनच बूथ यंत्रणा लावण्यामध्ये भारतीय जनता पार्टीने योग्य नियोजन केल्याचेही बोलले जात आहे. मोठमोठ्या सभाद्वारे केवळ भाजपावर आगपाकड करणाऱ्या काँग्रेसला मतदारापर्यंत पोहोचण्यामध्ये वेळच मिळाला नसून या उलट भारतीय जनता पार्टीचे सुपर वॉरियर्स मात्र होम टू होम प्रचार करताना दिसून आले आहेत.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीचे रूपांतर मतांमध्ये ज्या पद्धतीने करता येत नाही, त्याच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलेल्या नागरिकांच्या माताचे रूपांतर काँग्रेसकडे वळवण्यामध्ये आणि काँग्रेसच्या बाजूने नागरिकांचा असलेला विचारांचा टेम्पो तसाच ठेवण्यामध्ये अपयश आल्याचेही नागरिकांमधून बोलले जात आहे. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन्हीही आमदारांची आज व उद्या खरी सत्वपरीक्षा असून ते कशा पद्धतीने यंत्रणा लावतात हे येणाऱ्या निकालावरूनच समजणार आहे.