जिल्हाप्रमुखपद असो किंवा नसो ;सर्वसामान्यांची कामे करायला पद नाही तर निस्वार्थीपणा लागतो
मोहोळ, धुरंधर न्युज
मोहोळ तालुक्यातील शिवसेना मुख्यमंत्री शिंदे सेनेच्या गटातील राजकीय वाद उफाळून आला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व कामे योग्य पद्धतीने सुरू आहेत. ज्यांनी पक्षाचे नाव वापरून काहीच केले नाही, त्यांनीच मला जिल्हाप्रमुख पदावरून बदलण्याचे षडयंत्र रचले आहे. याचा विचार वरिष्ठ करतील त्याचे फारसे कोणी टेन्शन घेऊ नये, माझ्यावर टीका करण्यात वेळ घालविण्यापेक्षा त्यांनी शिंदे सेनेने केलेली कामे सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्यात वेळ घालवावा, व पक्ष वाढवावा, अशी टीका जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी केली.
या संदर्भात अधिक माहिती देताना चवरे म्हणाले, मी तालुका प्रमुख असताना माझ्या कार्यकाळात मी १८९ शिवसेनेच्या शाखा काढल्या. पक्ष वाढविण्यासाठी माझा प्रयत्न नेहमीच असतो व आहे. शाखा काढणे हे तालुका प्रमुखाचे काम असते, जिल्हा प्रमुखाचे नाही. टीका असावी परंतु अभ्यासपूर्ण असावी, मी जरी जिल्हाप्रमुख पदावर असलो काय नसलो काय सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी पद लागत नाही. शेवटी मुख्यमंत्री शिंदे गटाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करू शकतो. माझ्या बदलाचा फारसा कुणी विचार करू नये, सर्वांच्याच कामाचा लेखाजोखा वरिष्ठाकडे असतो. लोकांची मापे काढत फिरण्यापेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वसामान्यसाठी केलेली विकास कामे त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यात वेळ घालवावा, त्याचा फायदा येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी होईल.
यासह मी साधारण शेतकरी कुटुंबातून आलो आहे. ग्रामपंचायत सदस्यापासून तालुका, जिल्हा प्रमुख पदापर्यंत स्वकर्तुत्वाने आलो आहे. माझ्या कामाची दखल घेत मला वरिष्ठांनी गोरगरीब जनतेच्या विकासासाठी काम करण्याची संधी दिली, हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. आणि राहिला विषय ग्रामपंचायत निवडणुकीचा तर त्या निवडणुकीत पक्ष नसतो, केवळ गावचा विकास हाच एकमेव मुद्दा असतो, त्यामुळे जे आमच्या बरोबर आले, त्यांना बरोबर घेऊन निवडणूक जिंकली त्यात काय गैर आहे? यापूर्वीच्या तालुकाप्रमुखांनी पक्षासाठी फारसे काम केले नाही, त्यामुळे त्यांच्या ऐवजी नवीन तालुका प्रमुखाची नियुक्ती केली. यात चुकीचे काय आहे. मुख्यमंत्री व पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांना तालुक्याची वस्तुस्थिती सांगून दोन टप्प्यात साडेसोळा कोटींचा विकास निधी आणला. दीड कोटीचा निधी विद्यमान आमदारामुळे परत गेला. मी तो निधी तालुक्यातील दहा गावांच्या विकासासाठीच आणला होता, तो काय माझ्या गावासाठी वा स्वतःसाठी आणला नव्हता. माझ्यावर कोण टीका करते याकडे लक्ष देऊन त्यांच्या टिकेला उत्तर देण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ विकास हाच आपला एकमेव अजेंडा असल्याचे जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले.