वृद्धाश्रमच्या नूतन इमारतीच्या जागेचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते कुमार करजगी यांच्या हस्ते संपन्न
मोहोळ/धुरंदर न्यूज
प्रार्थना फाऊंडेशन ही संस्था समाजाच्या हिताचे भरीव कार्य करत असून भविष्यात संस्था सामाजिक क्षेत्रात खूप मोठं कार्य करील यात कोणतीच शंका नसून प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेले वृद्धाश्रम निराधार वयोवृद्ध लोकांसाठी मंदिर बनेल तर समाजासाठी एक आदर्श प्रकल्प बनेल, यासह वृद्धाश्रमाच्या नूतन इमारतीचे काम लवकरात लवकर सुरू होऊन ते पूर्णत्वास जाईल, असा विश्वास ज्येष्ठ नेते कुमार करजगी यांनी व्यक्त केला.
मोरवंची (ता.मोहोळ) येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्त वृद्धाश्रमच्या नूतन इमारतीच्या जागेचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते कुमार करजगी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते.
प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून २०१८ पासून विविध सामाजिक विषयांवर काम केले जाते. त्यातीलच वृद्धाश्रम हा एक निवासी प्रकल्प जिथे निराधारांना आधार दिला जातो. सध्या समाजात कित्तेक निराधार, बेघर, अनाथ वयोवृध्द आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसतात. काहींना कुटुंब परिवार असतो तर काहींना नसतो. कित्तेक आज्जी आजोबांना घरी सांभाळलं जात नाही, घरातून हाकलून दिले जाते, कित्येकदा त्यांना कुठे तरी रस्त्याच्या, स्टेशन किंवा मंदिर परिसरात आणून सोडले जाते. अशा सर्व वयोवृध्द गरजू आजी आजोबांना खरंतर वृद्धापकाळात प्रेमाची, आधाराची, आपलेपणाने चौकशी करण्याची, काळजी घेण्याची गरज असते. अशाच वयोवृद्धांना आधार देण्यासाठी प्रार्थना फाऊंडेशन च्या माध्यमातून मोरवंची येथे मोफत (निशुल्क) वृद्धाश्रम चालवले जाते. त्याचे उदघाटन पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे व स्मिता कोल्हे यांच्या हस्ते केले होते. पण आश्रमात वाढत्या आजी आजोबांची संख्या पाहता त्यांना एक स्वतंत्र निवारा असणे गरजेचे होते, असे मत संस्थेच्या सचिव अनु मोहिते यांनी व्यक्त केले.
यासह मोरवंची गावचे सरपंच राहुल धोत्रे यांनी आश्रमाला लागणाऱ्या शक्य तितक्या सर्व सोई सुविधा ग्रामपंचायत तर्फे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मोरवंची गावचे सरपंच राहुल धोत्रे, संगीता मोहिते, सचिव अनु मोहिते, प्रसाद मोहिते, आजी आजोबा आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.