भीमा बचाव संघर्ष समिती ची उद्या बैठक
मोहोळ/धुरंधर न्यूज
भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर पंचवार्षिक निवडणूक 2022 अत्यंत जवळ आली असतानाच विद्यमान चेअरमन खा. धनंजय महाडिक यांच्याविरोधात माजी आमदार राजन पाटील व आ. प्रशांत परिचारक यांचे कडवे आव्हान उभे राहणार असून याच पार्श्वभूमीवर रविवारी भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर पंचवार्षिक निवडणुक संदर्भात भीम बचाव समितीची महत्त्वाची बैठक मोहोळ तालुक्याचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील व पंढरपूर तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दिलीप घाडगे यांच्या सुस्ते येथील चौकात रविवार दि. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता भीमा बचाव संघर्ष समितीची व कार्यकर्त्यांची विचार विनिमय बैठक मोहोळ तालुक्याचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील व पंढरपूर तालुक्याचे युवा नेते प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता माजी आमदार राजन पाटील व आमदार प्रशांत परिचारक यांचे भीमा निवडणुकीत विद्यमान चेअरमन खा. धनंजय महाडिक यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्यान रविवारी होणाऱ्या या बैठकीकडे भीमा पट्ट्यातील ऊस उत्पादक सभासदांचे लक्ष लागले आहेत.
दरम्यान राज्यातील पूर परिस्थितीच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात आलेली भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ज्या टप्प्यावर आहे, त्या टप्प्यावर ३० सप्टेंबर पर्यंत स्थितीत स्थगित केली होती. त्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच अर्ज माघारी घेण्याच्या तारखे मधील तीन दिवस अगोदर सदरची निवडणूक स्थगित झाली. दरम्यान १८ ऑक्टोंबर रोजी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्रकुमार दराडे व निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी प्रसिद्धीकरणाद्वारे भिमाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामध्ये १ नोव्हेंबर २०२२ ते ३ नोव्हेंबर २०२२ या तीन दिवसांमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्धीकरण व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. तर दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सांय. ५ वाजेपर्यंत निवडणुकीचे प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तसेच लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर स्थगित करण्यात आलेली भीमाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखान्याचे रणशिंग फुंकले जाणार असून दिवाळीच्या फटाक्यांनंतर निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांचे फटाके ही फुटणार असून सभासदांमध्ये या निवडणुकीची उत्सुकता लागली आहे.