उजनीचे पाणी पळविण्याच्या जुलमी शासन निर्णयाविरोधात मोहोळ येथे रविवारी भव्य रास्ता रोको आंदोलन

यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचा आंदोलनाचा पावित्रा

उजनी धरणातील पाणी पळवून नेऊन आखली गेलेली लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारी असून या जुलमी शासन निर्णयाच्या विरोधात यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ येथे सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कन्या प्रशाला जवळ दि.२२ मे रोजी सकाळी दहा वाजता भव्य रस्ता रोको चे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना ही सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारी असून तरीही शासनाने या योजनेस ३५० कोटी रुपये अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन बारामती व इंदापूर तालुक्याला उजनी धरणातील पाणी देऊन सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. याचा फटका सोलापूर जिल्ह्यासहित याअगोदर पाणी लवादा नुसार वाटप झालेल्यानुसार लातूर, उस्मानाबाद या मराठवाड्यातील जिल्ह्यालाही बसणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपसा सिंचन योजना अपूर्ण असताना नवीन योजनेला दिला गेलेल्या निधीला सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. सदर निर्णय हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खून करणारा असून सोलापूर जिल्ह्यातील पाणी योजना अपूर्ण असताना नवीन योजना शासन माथी मारत आहे. या जुलमी शासन निर्णयानुसार यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्व शेतकर्‍यांच्या वतीने सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ येथील इंदिरा कन्या प्रशाला जवळ दि.२२ मे रोजी सकाळी दहा वाजता भव्य रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या वेळी समितीचे समन्वयक नागेश वनकळसे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावडे, नगरसेवक महादेव गोडसे, सौदागर साठे, अशोक गायकवाड, अविनाश क्षीरसागर, चंद्रकांत बरकडे, देविदास चेंडगे, नामदेव केवळे, आनंद वाघमोडे, उज्वल वाघमारे, कीर्तीरत्न क्षिरसागर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *