पब्जी या ऑनलाईन गेम मध्ये हरल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन केल्याने उपचारा दरम्यान त्याचा अकलूज येथे दवाखान्यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावातील तरुण ओंकार नारायण सालविठ्ठल (वय २१वर्षे )हा काही कामानिमित्त वेळापूर येथे आला होता. दि.१८ एप्रिल रोजी ऑनलाईन पब्जी गेम खेळत असताना या गेम मध्ये हरल्यामुळे नैराश्य मध्ये येऊन त्याने विषारी औषध प्राशन केले. त्यामुळे त्याला विषबाधा झाली. उपचारासाठी त्याला अकलूज येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आले होते.
दरम्यान उपचार चालू असताना दि.१९ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. अकलूज पोलीस स्टेशन चे पो. ह. रमेश सुरवसे पाटील यांनी रीतसर पंचनामा करून पोस्टमार्टेम करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
पब्जी गेम वर बंदी आणावी, नागरिकांची मागणी
पब्जी या गेम मुळे यापूर्वी देखील अनेक बळी गेले आहेत.गेल्या २ वर्षांपासून कोरोना च्या पार्श्वभूमीवर शाळा -महाविद्यालय बंद असल्यामुळे सर्व अभ्यासक्रम हा ऑनलाईन होत होता. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्याना अभ्यास करण्यासाठी महागडे मोबाईल घेऊन दिले. परंतु अभ्यास करण्याऐवजी मुले -मुली ऑनलाईन गेम खेळत आहेत. या ऑनलाईन गेम मध्ये हरल्यानंतर अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. त्यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन या गेम वर बंदी आणावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.