रविवारी भीमा परिवाराची पुळूज येथे कार्यकर्त्यांची सहविचार सभा
मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक जाहीर झाली असून भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी ३१ जुलै रोजी मतदान होणार असून, दि.२४ पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. दरम्यान पहिल्या दिवशी ६४ अर्जांची विक्री झाली असून भीमा साखर कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन सतीश जगताप यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे.
भिमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी एकूण ६४ अर्जांची विक्री झाली असून विद्यमान व्हाईस चेअरमन सतिश जगताप यांचा दि.२४ रोजी पहिल्याच दिवशी निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांच्याकडे एकमेव अर्ज दाखल केला. यावेळी संचालक तुषार चव्हाण,अंकुश आवताडे, युवराज चौगुले, उत्तम बाबर, तानाजी जगताप आदी उपस्थित होते.
नुकताच टाकळी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा विजयाबद्दल भव्य नागरी सत्कार मेळाव्यात महाडिक यांनी भीमा सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासाठी सर्वांना आवाहन केले होते. मात्र निवडणुकीबाबत माजी आमदार राजन पाटील व आमदार प्रशांत परिचारक काय निर्णय घेणार?, याकडे सभासदांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस उत्पादक मतदारसंघातून ९ संचालक निवडले जाणार आहेत. त्यामध्ये पुळूज, टाकळी सिकंदर, अंकोली व सुस्ते गटातून प्रत्येकी दोन तर कोन्हेरी गटातून एक संचालक निवडला जाणार आहे. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधीमधून एक संचालक निवडला जाणार आहे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीमधून एक, महिलांमधून दोन, इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमधून एक, भटक्या विमुक्त जाती/ जमाती / विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीमधून एक असे एकूण १५ संचालक निवडले जाणार आहेत.