मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील महत्वपूर्ण व बहुचर्चित असलेला भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक जाहीर झाली असून भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी ३१ जुलै रोजी मतदान होणार असून, आज दि.२४ जून पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होत आहे.
याबाबत भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आज दि.२४ जून रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्धीकरण केला असून यामध्ये दि. २४ ते ३० जून दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. दाखल झालेल्या अर्जांची छाननी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. वैध नामनिर्देशनपत्रांची यादी ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ ते १८ जुलै यादरम्यान मुदत देण्यात आली आहे.
निवडणूक लढणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता केले जाणार आहे. भीमा कारखान्यासाठी मतदान आवश्यक असल्यास ३१ जुलै रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे. १ ऑगस्ट रोजी कारखान्याची मतमोजणी होणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी भोळे यांनी सांगितले.
भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस उत्पादक मतदारसंघातून ९ संचालक निवडले जाणार आहेत. त्यामध्ये पुळूज, टाकळी सिकंदर, अंकोली व सुस्ते गटातून प्रत्येकी दोन तर कोन्हेरी गटातून एक संचालक निवडला जाणार आहे. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधीमधून एक संचालक निवडला जाणार आहे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीमधून एक, महिलांमधून दोन, इतर मागासवर्गीय प्रतिनिधीमधून एक, भटक्या विमुक्त जाती/ जमाती / विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधीमधून एक असे एकूण १५ संचालक निवडले जाणार आहेत.
नुकताच टाकळी सिकंदर येथे भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय महाडिक यांनी भीमा सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासाठी सर्वांना आवाहन केले होते. मात्र निवडणुकीबाबत माजी आमदार राजन पाटील व आमदार प्रशांत परिचारक काय निर्णय घेणार?, याकडे सभासदांसह जनतेचे लक्ष लागले आहे.