धुरंधर न्यूज
गेल्या दोन दिवसांपासून विभागीय आयुक्त स्तरावरील पथक मोहोळ तहसील कार्यालयात चौकशीसाठी ठाण मांडून बसले आहे. यामध्ये दोन उपजिल्हाधिकारी यांच्यासह बारा अधिकाऱ्यांचा समावेश असून तहसील अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील कार्यालयीन दप्तर तपासणी सुरू आहे. दरम्यान गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच तहसील तपासणीसाठी आलेल्या चौकशी समिती नियमित कार्यालयीन तपासणीसाठी असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र तहसीलदारांविरोधात झालेल्या तक्रारीच्या संदर्भात ही तपासणी समिती आली असल्याचे चर्चा सुरू आहे.
मोहोळचे तहसील प्रशासन हे सध्या विभागीय आयुक्त स्तरावरील चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून मंगळवार दि.२ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजले पासून ते बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत दोन उपजिल्हाधिकारी यांच्यासह १२ अधिकाऱ्यांचे पथक तपासणीसाठी तहसील विभागात ठाण मांडून असून यामध्ये विविध विभागातील कार्यालयीन दप्तरी असलेल्या फायली संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलवर तपासणीसाठी ठेवताना संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी पळापळ करताना दिसून येत होते. याबाबत समिती कडून नियमित कार्यालयीन तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या कार्यपद्धती बाबत संजीव खिलारे, दशरथ काळे यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी तसेच पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने ही तपासणी सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या दोन दिवसांपासून तहसील आवारात शांततेचे वातावरण असून तहसील विभागात कामकाजात अनियमितता आढळल्यास समंधीत अधिकऱ्यांवर कारवाई होणार का? की केवळ चौकशी तपासणी समितीचा फार्स ठरेल अशी चर्चाही तहसील आवारात रंगली आहे.
दरम्यान तपासणी समिती मधील उपजिल्हाधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता, ही विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार मोहोळ तहसील कार्यालयीन तपासणी सुरू असून या तपासणीचा अवहाल विभागीय आयुक्तांकडे पाठविणार असल्याचे ही यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले.