मोहोळ तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच, आजच्या अपघातात 2 जण जागीच ठार

मोहोळ तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच असून शुक्रवारी पहाटे पाच वाजताच्या दरम्यान सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देवडी गावच्या हद्दीमध्ये उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून पिकअप ने धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये दोन जन जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दि.१३ मे रोजी पहाटे पाच वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि.१३ मे रोजी पहाटे पाच वाजता च्या सुमारास सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देवडी (ता. मोहोळ) गावच्या हद्दीमध्ये हॉटेल श्रीकृष्ण येथे चहा पिण्याकरता आयशर टेम्पो क्रमांक एम एच ४३ बी आर ५२५२ हा रोडच्या खाली उभा केला होता. दरम्यान चालक चेतन विभीषण खंदारे हे पुन्हा टेम्पो मध्ये बसत असताना टेम्पो च्या पाठीमागे धडकलेला मोठा आवाज होऊन आयशर टेम्पो पुढे गेला. यावेळी त्यांनी उतरून पाहिले असता आयशर टेम्पो ला पाठीमागून आलेल्या पिकअप क्रमांक एम एच २० ई एल ७२८२ ने जोराची धडक दिली. यामध्ये केबिनमध्ये बसलेले रिजवान अब्दुलअजीज शेख, वय-२२, रा. वैजापूर, औरंगाबाद व रिहान फैजल, वय ३५ रा. झारखंड या दोन व्यक्तींना जबर मार लागून अडकून गंभीर जखमी होऊन ते जागीच मयत झाले होते. तर पाठीमागे रिकाम्या कागदी बॉक्स ला धरून दोन व्यक्तीना किरकोळ मुका मार लागून जखमी झाले. त्यांना तात्काळ सोलापूर येथे रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवून देण्यात आले असल्याची खबर आयशर टेम्पोचे चालक चेतन बिभीषण खंदारे रा. नरखेड यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास अपघात विभागाचे ज्योतिबा पवार हे करीत आहेत.

गुरुवारी झालेल्या अपघातात एक मयत

दरम्यान गुरुवारी पुण्याहून लातूर कडे एम एच १२ टी एफ ०९७१ या मोटार सायकल वरून तेजस अंधारे (वय २२) रा. हडपसर, पुणे, व विशाल मधुकर माने (वय २०) रा. औराद, ता.निलंगा (सध्या पुणे) हे दोघे निघाले होते. दुपारी चार वाजता च्या सुमारास मोहोळ शहराच्या पुढे कोळेगाव हद्दीमध्ये एका अज्ञात वाहनाला मोटर सायकलची जोरात धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये तेजस अंधारे हा युवक जागीच ठार झाला होता. तर विशाल मधुकर माने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमीला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *