क्रांतीवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांची मागणी
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आठवडा बाजार पर्यंत असलेला मुख्य रस्ता निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खड्डेमय झाला असून सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, अन्यथा दि.१५ ऑगस्ट रोजी खड्ड्यातच उपोषण करणार असल्याचा इशारा क्रांतीवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांनी दिला आहे.
याबाबत मोहोळ नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांना क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ नगरपरिषद स्थापन झाले पासून नगरपरिषदेत सुमारे ७० ते ८० कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामासाठी मिळालेला असून शहरातील बहुतांश विकास कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत, त्याचाच एक भाग मोहोळ शहरातील शिवाजी महाराज चौक ते आठवडा बाजार पर्यंतचा हा मुख्य रस्ता असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता आहे हे मोहोळवाशी यांना समजत नाही. शहरातील सर्वच नागरिक, शाळकरी मुले, महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपरिषदेच्या कार्यालयासमोरच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. अधिकारी वर्गाकडून रस्त्याबाबत दुर्लक्ष होत असून कोणतीही कारवाई केली जात नाही. मोहोळ शहरातील नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी शहरांमध्ये नगरपरिषद स्थापन झाले पासून सर्वच विविध विकास कामांची दुरुस्ती करावी तसेच मोहोळ शहरातील मुख्य रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा नगरपरिषद समोरील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये दि.१५ ऑगस्ट रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांनी दिला आहे.
यावेळी पृथ्वीराज काळे, बाळासाहेब क्षीरसागर, तुकाराम माने, संगम बळवंतराव, गोरख पाटील, श्रीशैल निस्ताने, दीपक लेंगरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.