मोहोळ, धुरंधर न्युज
कर्मचारी व अधिकारी यांच्याशी हातमिळवनी करीत संगणमताने वारसाहक्काचे केलेले बेकायदेशीर वाटप पत्र रद्द करावे, या मागणीसाठी ग्राहक समितीचे युवक तालुकाध्यक्ष गणेश काकडे यांनी तहसील आवारात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
मोहोळचे तत्कालीन तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या कार्यकाळामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी हातमिळवणी करत संगणमताने ८५ अ प्रकरणातून वारसा हक्काने केलेले बेकायदेशीर प्रकरण रद्द करावे, अशी मागणी ग्राहक समितीचे युवक तालुकाध्यक्ष गणेश काकडे यांनी केली होती. मात्र याकडे प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. अखेर दि.१४ नोव्हेंबर रोजी दुपारी तहसील आवारामध्ये बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत असताना मोहोळ पोलिसांनी गणेश काकडे यांना ताब्यात घेतले. दरम्यान प्रशासनाने तात्काळ बेकायदेशीर केलेले वाटपपत्र प्रकरण रद्द करावे, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशाराही गणेश काकडे यांनी दिला आहे.