सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडली घटना
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीमध्ये महामार्गाच्या मधोमध बंद अवस्थेत धोकादायक स्थितीत असलेल्या आयशर टेम्पो ला पाठीमागून रुग्णाला घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेची पाठीमागून आयशर टेम्पो ला जोराची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर अन्य ५ जण जखमी झाल्याची घटना दि.१९ एप्रिल रोजी पहाटे साडेसहा वाजता च्या दरम्यान घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथून कर्नाटक कडे निघालेला आयशर टेम्पो क्र. के. ए ४१ ए ४२९२ हा सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून निघाला असताना मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी गावच्या हद्दीमध्ये रायगड धाब्याच्या जवळ अचानक इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडला. त्यामुळे चालक मुतण्णा महादेवप्पा हे टेम्पो उभा करून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये मेकॅनिकला संपर्क साधण्यासाठी गेले होते. दरम्यान मुंबईहून रुग्णवाहिका क्र. एम. एच ०४ जे. यु ४७४२ मध्ये एक रुग्ण घेऊन डॉ. शैलेश आर चौधरी, रुग्णवाहिका चालक सुहास मुकुंद हौसलमल, दत्तात्रय अर्जुन खरटमल, ज्योती दत्तात्रय खरटमल, रा. हैदराबाद, विशाल सरदार रा. वाशी आणि जयप्पा एकनाथ गावडे, रा. कल्याण असे ६ जण निघाले होते. दरम्यान पहाटे साडे सहा वाजताच्या सुमारास वडाचीवाडी हद्दीमध्ये आले असता या बंद पडलेल्या धोकादायक स्थितीतील आयशर टेम्पो ला रुग्णवाहीकेने पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये सुहास मुकुंद हौसलमल (वय-३६), रा. नवी मुंबई यांना गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले, तर रुग्णवाहिकेत वरील पाच जण जखमी झाले. हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी व स्थानिक नागरिकांनी जखमींना तात्काळ सोलापूर येथील रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी पाठवून दिले. या अपघाताची मोहोळ पोलिस ठाण्यांमध्ये खबर टेम्पो चालक मुतण्णा महादेवप्पा यांनी दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.