सारोळे येथील घटना
मोहोळ पंढरपूर आळंदी पालखी महामार्गावर मोहोळ च्या दिशेने राँग साईड ने भरधाव वेगात जाणाऱ्या लक्झरी बस ने बोलेरो जीपला धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये नवरी सोडण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सारोळे (ता. मोहोळ) येथे दि.२२ एप्रिल रोजी पहाटे १ वाजता झाली असून अपघातामध्ये मयत झालेले दोन्ही युवक पळशी व सुपली (ता. पंढरपूर) येथील आहेत.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळशी (ता. पंढरपूर) येथील अरुण भानदास केंगार (वय-३५) व सुपली येथील सुरेश बबन भोसले (वय-३०) या दोघांनी गावातीलच बाळू वाघमारे यांची बोलेरो जीप क्रमांक एम एच १३ ए झेड ३८६९ ही घेऊन सोलापूर येथे नवरी सोडण्यासाठी गेले होते या दोघांनी सोलापूर येथील हळदीचा कार्यक्रम व जेवण करून सोलापूर येथून रात्री बारा वाजता गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान दि.२२ एप्रिल रोजी पहाटे एक वाजताच्या सुमारास सारोळे (ता. मोहोळ) येथील लादे वस्तीच्या जवळ आले असता समोरून रॉंग साईडने भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बस क्रमांक ए आर ०६ ए ८४१७ ने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये पळशी (ता. पंढरपूर) येथील अरुण भानदास केंगार (वय-३५) व सुपली येथील सुरेश बबन भोसले (वय-३०) या दोघांच्या हात, पायाला व डोक्यास मार लागून जागीच मयत झाले.
या भयानक अपघातामध्ये बोलेरो गाडीचा जागीच चक्काचूर झाला असून लक्झरी बस चे ही मोठ्या नुकसानीस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता लक्झरी बसचा चालक वाहन सोडून पळून गेला असल्याची फिर्याद नवनाथ भानदास केंगार रा. पळसी (ता. पंढरपूर) यांनी दिली असून यानुसार मोहोळ पोलिसांनी लक्झरी बसचा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघात पथकाचे प्रमुख अविनाश शिंदे व सहाय्यक फौजदार ज्योतिबा पवार हे करीत आहेत.