घराच्या वास्तुशांती साठी पुण्याहून गावाकडे निघालेल्या २४ वर्षीय युवकाचा अपघातात मृत्यू

एक जण जखमी

गावाकडे घराच्या वास्तुशांती साठी पुण्याहून निघालेल्या मोटरसायकल वरील दोन युवकांना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहतूक वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये २४ वर्षीय मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.२ मे रोजी पहाटे चार वाजताच्या दरम्यान मोहोळ शहरामध्ये सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कन्या प्रशाला चौकामध्ये घडली.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शावळ तांडा (ता. अक्कलकोट) येथील सागर विश्वनाथ चव्हाण (वय २४) तर सचिन सहदेव चव्हाण (वय २५) हे पुणे येथे कंपनीमध्ये कामाला आहेत. सागर चव्हाण यांच्या घराची वास्तुशांती असल्यामुळे दि.१ मे च्या रात्री ते पुण्याहून सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरून मोटारसायकल क्रमांक एम एच १२ एस झेड ६२२० वरून गावाकडे निघाले होते, दरम्यान मोहोळ येथील कन्या प्रशाला स्पीड ब्रेकर वर आले असता पाठीमागून वेगात येणाऱ्या मालवाहतूक क्रमांक एम एच २४ ए यु ५२०२ या वाहनाने मोटर सायकल ला पाठीमागून जोराची धडक दिली, व ती मोटरसायकल तसेच पुढे जाऊन डिवाईडर वर धडकली. यामध्ये मोटरसायकलस्वार सागर विश्वनाथ चव्हाण च्या डोक्यास, हातास मार लागून जखमी होऊन तो जागीच मयत झाला, तर मोटरसायकल वर पाठीमागे बसलेला सचिन सहदेव चव्हाण याच्या डोकीस व हातास मार लागून तो जखमी झाला आहे. त्यास मोहोळ ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून अविचाराने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून, स्पीड ब्रेकर वरून जाणाऱ्या डबलसीट मोटरसायकल ला धडक देऊन एक मयत तर एक जण जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल मालवाहतूक करणाऱ्या वाहनावर वृद्ध मयताचे चुलते शेडजी लालू चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *