यापूर्वी आपल्या हक्काच्या अनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघातून तालुक्यातील नेत्यांना व कार्यकर्त्यांना त्याग करीत वेळोवेळी संधी देऊन पदे देणारे स्वाभिमानी नेते बाळराजे पाटील यांनी पेनुर सर्वसाधारण जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी, अशी मागणी पेनूर चे माजी उपसरपंच सज्जन चवरे यांनी केली आहे.
मोहोळ तालुक्यातील ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समिती गणांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामध्ये पेनुर जिल्हा परिषद गट वगळता तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट आरक्षित झाल्याने अनेकांना जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नाही, मात्र पेनुर गट ओपन झाल्याने येथील हाय व्होल्टेज लढतीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेमध्ये यापूर्वी दोन टर्म प्रतिनिधित्व करणारे तसेच माजी शिक्षण व आरोग्य सभापती बाळराजे पाटील यांनी अनगर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून तालुक्यातील नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे गट आरक्षित झाल्यास त्यांना अनगर मधून प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. याच पाश्वभूमीवर मोहोळ तालुक्याच्या तसेच पेनुर जिल्हा परिषद गटाच्या विकासाच्या दृष्टीने लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम करणे आवश्यक असून यासाठी सर्वसाधारण साठी आरक्षित असलेल्या पेनुर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची मागणी पेनूरचे माजी उपसरपंच सज्जन चवरे यांनी केली आहे.