युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम
मराठी माणसांचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना केंद्र सरकारने परत बोलावून घेऊन पदावरून हकलपट्टी करावी, तसेच त्यांनी माफी मागावी, यासह शिवसेना खा. संजय राऊत यांच्यावर भाजप व केंद्र सरकार खोटे व बिनबुडाचे आरोप करून त्यांना केंद्रीय तपास यंत्रणेकडून नाहक त्रास देत असल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
मोहोळ येथे रविवारी मोहोळ नगर परिषदेसमोर मोहोळ शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने एकत्र येत निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू मध्ये फूट पाडणाऱ्या व मराठी माणसाचा सतत अपमान करणाऱ्या राज्यपालांना केंद्र शासनाने परत बोलून घ्यावे, त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी करून राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी मराठी माणसाच्या भावना दुखावल्याबद्दल तमाम मराठी माणसांची माफी मागावी, या सह शिवसेना खा. संजय राऊत यांच्यावर भाजप व केंद्र सरकार खोटे व बिनबडाचे आरोप करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देत आहे, राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते व कट्टर शिवसैनिक असून त्यांच्या पाठीमागे जाणून-बुजून भाजप व केंद्र सरकार वेगवेगळ्या तपास यंत्रणा लावून हा त्रास देण्याचे काम करत आहेत, मात्र त्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीर उभी असून त्यांच्यावर कारवाई केल्यास शिवसेना स्टाईलने व लोकशाही पद्धतीने जशास तसे उत्तर देऊ, अशा आशयाचे निवेदन यावेळी मोहोळ तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना देऊन निषेध आंदोलन करण्यात आले. यानिमित्ताने युवा सेनेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आयोजित केली आहे.
यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सीमाताई पाटील, तालुकाप्रमुख अशोक भोसले, माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड, माजी तालुकाध्यक्ष काकासाहेब देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख महेश देशमुख, उप जिल्हाप्रमुख दादासाहेब पवार, शहर प्रमुख विक्रम देशमुख, वाहतूक प्रमुख सोमनाथ पवार, रणजीत गायकवाड, प्रा. महेश भोसले, बाळासाहेब वाघमोडे, विक्रम भोसले, संतोष चव्हाण, जमीर मुजावर, रणजीत गायकवाड, आशिष आगलावे, सत्यवान देशमुख, प्रकाश पारवे, ज्योतीताई नागणे, विजय गायकवाड, राजाभाऊ गुंड, भाऊसाहेब कदम, सचिन जाधव, कयूम शेख, माधव इंगळे आदि सह कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.