महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामधील एका ५५ वर्षीय निवृत्त कंडक्टरने गुलमोहराच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.३० मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे उघडकीस आली.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील सिद्धेश्वर मारुती परबतराव (वय-५५) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये कंडक्टर म्हणून नोकरीत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना सांगोला आगार येथे नियुक्तीस असताना त्रास होऊ लागल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांना दारूचे व्यसनही होते. दि.२९ मार्च रोजी पंढरपूर येथे राहत असलेल्या मुलाकडे कुटुंबासह भेटण्यास सिद्धेश्वर परबतराव गेले होते. मात्र पुळूज येथे मावशींना भेटायला जातो, असे सांगून ते घरातून निघून गेले होते. दरम्यान त्यांनी टाकळी सिकंदर येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या पाठीमागे असणाऱ्या गुलमोहर च्या झाडाला दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची खबर मृताच्या पत्नी सीमा सिद्धेश्वर परबतराव यांनी मोहोळ पोलिसात दिली असून त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार लोबु चव्हाण हे करीत आहेत.