मोहोळ तालुक्यात अचानकच रविवारी पहाटे झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून शेतमालासह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दरम्यान विजेच्या कडकडाट होऊन येणकी (ता. मोहोळ) येथील तीन गायींचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, तर इतर शेतकऱ्यांच्या आंबा व चिक्कू या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या आठवड्या पासून सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली होती मात्र ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरणात कमालीचा उकाडा वाढला होता. रविवारी पहाटे अचानक आकाशात ढगांनी गर्दी केली व विजेच्या कडकडाटा सह पावसाला सुरुवात झाली. त्या पावसातच जोरदार वीज कडकडल्याने
येणकी ता मोहोळ येथील धनाजी नागनाथ कदम यांच्या तीन गायीच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या पावसामुळे हवेत गारवा पसरला व नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान चालू वर्षी कडक ऊना मुळे आंब्याच्या झाडाचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला आहे, त्यातून झाडावर राहिलेल्या कैऱ्या कमी प्रमाणात होत्या, मात्र रविवारच्या पावसामुळे व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे त्याही गळून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सर्वात मोठे नुकसान ग्लास द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे झाले असून अनेकांचे द्राक्ष काढणीला आले आहेत तर अनेक शेतकऱ्यांचे द्राक्ष बेदाणा करण्यासाठी शेड वर टाकलेले आहेत अचानक आलेल्या पावसामुळे या शेतकऱ्यांची धांदल उठली असून भिजल्यामुळे आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हा पाऊस थोडा बहुत फायदेशीर असला तरी मोठ्या प्रमाणात नुकसानीचा असल्याचे शेतकऱ्यातून बोलले जात आहे.
दि.२४ एप्रिल रोजी मोहोळ तालुक्यातील सर्व मंडळातील पाऊस पुढीलप्रमाणे
मोहोळ — ९ मि मी.
कामती — ०० मिमी .
शेटफळ —- ०० मिमी.
वाघोली —–११ मिमी.
सावळेशवर — २ मि मी.
टाकळी —- १.४ मि मी
पेनुर —– २ मि मी
नरखेड — २ मिमी