कामती जिल्हा परिषद गटात सौ. अनिता महेश भोसले यांचे नाव चर्चेत

विकास, अनुभव आणि जनसंपर्काची मजबूत बाजू

मोहोळ / प्रतिनिधी

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहोळ तालुक्यातील कामती जिल्हा परिषद गट राजकीयदृष्ट्या चांगलाच तापू लागला असून, जिल्हा परिषद ओपन महिला जागेसाठी इच्छुकांची मांदियाळी उभी राहिलेली असताना सौ.अनिता महेश भोसले यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आले आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत.
विद्यमान ग्रामपंचायत सदस्या असलेल्या सौ. अनिता भोसले या चिंचोली काटी ग्रामपंचायतीतून कार्यरत असून, त्यांचा जनसंपर्क, कामाचा अनुभव आणि महिलांच्या प्रश्नांबाबतची ठाम भूमिका यामुळे त्या मतदारांमध्ये विशेष ओळख निर्माण करत आहेत.

कामती गट हा सामाजिकदृष्ट्या विविधतेने नटलेला गट असून, येथे ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या पार्श्वभूमीवर सौ. अनिता भोसले यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून केलेली कामगिरी, विशेषतः महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेली विकासाभिमुख धोरणे, मतदारांच्या पसंतीस उतरत असल्याचे बोलले जात आहे.


कामती जिल्हा परिषद गट ओपन महिला असल्याने सामाजिक समतोल राखणारी, सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारी आणि प्रशासनाशी समन्वय साधू शकणारी सक्षम महिला नेतृत्वाची गरज आहे. याच निकषांवर सौ.अनिता भोसले या खऱ्या अर्थाने पात्र ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांनी पाणीप्रश्न, स्वच्छता, महिला बचत गट, अंगणवाडी, रस्ते व मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, त्या कामांची थेट अनुभूती ग्रामस्थांना आलेली आहे.

त्यांचे पती महेश भोसले यांनीही कामती जिल्हा परिषद गट ओपन महिला असल्याने आम्ही माझ्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवत आहोत अशी स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे या उमेदवारीला अधिक बळ मिळाले आहे. राजकीय अनुभव, सामाजिक संपर्क आणि कार्यकर्त्यांचे जाळे या जोरावर ही उमेदवारी अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसत आहे.


सध्या कामती गटात अनेक इच्छुक असले तरी, स्वच्छ प्रतिमा, विकासाभिमुख विचारसरणी आणि संवेदनशील नेतृत्व या त्रिसूत्रीमुळे सौ. अनिता महेश भोसले यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. आगामी काळात त्यांच्या उमेदवारीबाबत अधिकृत घोषणा झाल्यास, कामती जिल्हा परिषद गटातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, महिला नेतृत्वाला संधी देत विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याची तयारी कामती गटात होत असून, त्या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी सौ. अनिता महेश भोसले असतील, अशी भावना मतदारांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *