मोहोळ, धुरंधर न्युज
तालुक्यात या घटनेने उडाली खळबळ
तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिजाचे उत्खनन चालु आहे, महसुल प्रशासनाकडुन कोणतीही कार्यवाही केली जात नाही. म्हणून तुमची सोशल मिडीयावर बदनामी करेन, तुमच्या विरोधात अंदोलन करेन, अशा धमक्या देऊन ५० हजाराची मागणी करीत ३० हजारावर तडजोड करुन ८ हजार रुपये तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या हातुन स्विकारताना रंगेहात पकडुन संघटनेच्या तालुकाध्यक्षा सह शहराध्यक्ष अशा दोघाजनांवर शासकीय कामात अडथळा करुन खंडनी मागीतल्याप्रकरणी तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या वैभव जावळे याला न्यायालयात उभे केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असुन सदरची घटना दि. २३ डिसेंबर रोजी ४ .४५ वाजनेचे सुमारास तहसील कचेरीच्या आवारात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, शिरापुर मो येथील संघटनेचा तालुकाध्यक्ष वैभव जावळे हा दि. २३ ऑक्टोंबर २०२२ पासून तहसील कार्यालयामध्ये येऊन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य गौण खनिजाचे उत्खनन चालू आहे. महसूल प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. चिंचोली काटी येथील एमआयडीसी मधील बालाजी अमाईन्स कंपनीमध्ये यांनी देखील मोठ्या प्रमाणावर मुरूम उचलला आहे. त्यांच्यावर कारवाई का करीत नाही, असा जाब विचारला. यावर तहसीलदारांनी तुम्हाला जी माहिती हवी असेल, ती माहितीच्या अधिकारामध्ये मागून घ्या, असे सांगितले असता जावळे याने शहराध्यक्ष अजित कुलकर्णी याच्याशी फोनवरून बोलणे करून तुम्ही वैभव जावळे यांच्याकडे ५० हजार रुपये द्या, पैसे दिल्यास आम्ही आंदोलन करणार नाही, अशी मागणी केली होती. पैसे न दिल्याने गेल्या दोन महिन्यापासून विविध न्यूज पोर्टल व सोशल मीडिया वरून खोट्या बातम्या देऊन बदनामी करण्यास सुरुवात केली होती.
दरम्यान वारंवार कार्यालयामध्ये येऊन पैशाची मागणीही केली होती. तर दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास वैभव जावळे याने तहसील कार्यालयात येऊन फोन करून व व्हाट्सअपवर मेसेज करीत पुन्हा ३० हजार रुपये पैशाची मागणी केली. वारंवार शासकीय कामात अडथळा आणि कार्यालयाची सोशल मीडियावर बदनामी झाल्यामुळे वैतागलेल्या तहसीलदार यांनी या घटनेबाबत पोलिसांना कल्पना देत दि.२३ डिसेंबर रोजी पावणे पाच वाजताच्या दरम्यान कार्यालयाचे लिपिक आडगळे यांच्याकडे २०० रुपयांच्या ४० नोटा असे ८ हजार रुपये दिले होते. ते ८ हजार रुपये स्वीकारताना तालुकाध्यक्ष वैभव जावळे यास पोलिसांनी रंगेहात पकडले.
याबाबत तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भादवि ३५३, ३८४, ३८७, ५००, ५०४ ,३४ प्रमाणे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी व तालुकाध्यक्ष वैभव जावळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे हे करीत आहेत.