प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांचा मनमानी कारभार केल्याचा शिक्षकांचा आरोप
सोलापूर जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सकाळी साडेसात वाजताच पेनूर येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन येथे आकस्मिक भेट दिली. त्यांनी कार्यालयीन वेळेत हजर नसलेल्या तब्बल सोळा शिक्षकांना त्यांनी गैरहजर दाखवले. दरम्यान कार्यालयीन वेळेच्या अगोदर हजर राहत सर्व शिक्षकांना गैरहजर करून विद्यार्थ्यांसहित सर्वांनी ५ वाजल्याशिवाय शाळा न सोडण्याचा तोंडी फतवा काढला. शाळेची कार्यालयीन वेळ अधिकाऱ्यांना माहीत नसल्याने अपुऱ्या माहितीवर कारवाई झाल्याचा आरोप शिक्षकांनी केला.
पेनूर येथील जिल्हा परिषद शाळेत दि.१८ जून रोजी शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. यामुळेच सकाळीच सात वाजताच्या दरम्यान प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार यांनी शाळेला आकस्मिक भेट दिली शाळेची. शाळेची वेळ साडेसात आहे, असे सांगून एकूण १७ शिक्षकांपैकी तब्बल १६ शिक्षकांना गैरहजर शेरा मारला व अपुरी राहिलेली कामे ५ वाजेपर्यंत करून घ्या, असा शिक्षकांना आदेश दिला.
दरम्यान आरटीई ऍक्टनुसार शाळेची वेळ सकाळी आठ ते साडे अकरा असताना साडेसात वाजताच शिक्षणाधिकारी महोदयांनी सर्व शिक्षकांना गैरहजर करून टाकले व सायंकाळी पाच वाजता व्हिडिओ कॉल करून विद्यार्थ्यांसहित हजेरी दाखविल्याशिवाय न जाण्याचा तोंडी फतवा काढत शिक्षकांना सज्जड दम दिला.वास्तविक शाळेतील मुलांच्या मानसिकतेचा विचार करूनच शिक्षण विभागाने हा वेळ ठरविला असताना देखील मनमानी पद्धतीने कारभार करीत शाळेच्या कार्यालयीन वेळेच्या अगोदरच कारवाई केल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे
यावेळी प्रतिक्रिया देताना डॉ. लोहार म्हणाले की, पेनुर जिल्हा परिषद शाळेला अकस्मितत भेट दिली असता कार्यालयीन वेळेत हजर नसलेल्या शिक्षकांवर नियमानुसार गैरहजर ची कारवाई केली आहे. यासह शिक्षकांची अनेक कामे अपुरी असल्याचे निदर्शनास आले. शाळेमध्ये प्रचंड अस्वच्छता असून वार्षिक नियोजन, घटक नियोजन केलेले दिसून येत नाही. टाचण अपुरे आहेत. पाठ्यपुस्तके अस्ताव्यस्त पडलेली आहेत. ४०० विद्यार्थ्यांचा पट दाखवला जात असून प्रत्यक्षात १२५ विद्यार्थी हजर होते. मुले शाळेत येण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केलेला दिसून आले नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी सांगितले.
तर शाळेच्या वेळेसंदर्भात मोहोळचे गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी यांना शिक्षणाधिकारी लोहार यांनी सकाळी साडे सात वाजता फोन करून विचारले असता त्यांनी साडे सात ते साडे अकरा असल्याचे सांगितले, परंतु उन्हाळी सुट्टीमधील वेळ सांगितली. यामुळे विनाकारण शिक्षकांवर कारवाई झालेली आहे. याचा अर्थ जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी महोदयांना शाळेची वेळ देखील माहीत नसल्याचे वास्तव असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
शालेय कार्यालयीन वेळेपूर्वी हजर राहूनही शिक्षकांना गैरहजर करीत साडे अकरा ऐवजी दिवसभर ५ वाजेपर्यंत शाळेत थांबण्याची शिक्षा शिक्षणाधिकारी साहेबानी केली.वेळेत हजर राहूनही या शाळेतील शिक्षकांना विनाकारण बदनामी व दिवसभर थांबून चुकीचा शेरा मारला.
शिक्षक व विद्यार्थ्यांना दिवसभर म्हणजे ५ वाजेपर्यंत थांबण्याच्या तोंडी सूचना दिल्या होत्या मात्र दुपारी एकच्या दरम्यान पालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे नाईलाजाने व गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी यांच्या परवानगीने विद्यार्थ्यांना सोडण्यात आले. मात्र शिक्षकांना सकाळपासून ५ वाजेपर्यंत विना अन्नपाण्याचे मानसिक त्रास सहन करीत थांबावे लागले. शेवटी तीन वेळा व्हिडीओ कॉल करून देखील शिक्षणाधिकारी साहेबानी फोन न उचलल्याने फोटो काढून टाकत सर्व शिक्षक ५ वाजल्यानंतर घरी गेले.