“काय हायवे, काय वळणं? चाळीस अपघात, चोवीस मुडदं ? शेकडो जखमी ? तरीही समदं ओके !!

पोखरापूर ग्रामस्थांचा आक्रोश :

मोहोळ- पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील पोखरापूर गावाजवळ एक कि.मी. मध्ये सलग सात अपघाती वळणे दूर करा, ओढ्याचे पाणी जाण्यासाठी चुकीच्या जागी बांधण्यात आलेला ब्रिज ओढ्याच्या बाहेर पूर्वेला बांधण्यात आला आहे.महामार्ग प्राधिकरणाने या तांत्रिक बाबीकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने सर्वत्र नाराजी पसरली आहे.त्यामुळे पोखरापूर ग्रामस्थांनी ” काय हायवे, काय वळणं? चाळीस अपघात न् चोवीस मुडदे? शेकडो जखमी ? तरीही समदं ओके ? ” अशा‌ घोषणा देत पोखरापूर येथील जगदंबा मंदिरासमोर ग्रामस्थांनी आक्रोश आंदोलन केले.


यावेळी जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धोंडीबा उन्हाळे, दगडू आगलावे, नंदकुमार कदम, राहुल गुरव,भारत खंदारे,वामन खंडागळे, नागनाथ उन्हाळे, बाळासाहेब खंदारे,मोहोन खंदारे, नानासाहेब उन्हाळे, आत्माराम लेंगरे, धोत्रे, दत्तात्रय मोरे, प्रवीण कुलकर्णी, नितीन आगलावे आदी उपस्थित होते.


पोखरापूर येथील प्राचीन जगदंबा मंदिर हे राष्ट्रीय महामार्गात येत आहे. राज्याचे पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये संचालनालय मुंबई चे संचालकांनी ‘ प्राचीन मंदिर जतन करण्यासाठी प्रस्तावित महामार्गासाठी नवीन लाईन आराखडा तयार करावा’असे निर्देश दिलेले आहेत. तरीही संबंधित ठेकेदार व प्राधिकरण अधिका-यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत मंदिराच्या दोन्ही बाजूने महामार्गाचे काम सुरुच ठेवले आहे. शासनाच्या निधीचा अपव्यय केला जात आहे. कायदा धाब्यावर बसून मनमानी करणे, दडपशाही मार्गाने , खोटे गुन्हे दाखल करुन पालखी मार्गाचे काम करण्यात येत असल्याबद्दल व चुकीच्या पद्धतीने करण्यात येत असलेले काम तातडीने थांबवावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने, देवस्थान ट्रस्टच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केलेली आहे.

पोखरापूर गावाजवळ एक किलोमीटर अंतरात सलग सात अपघाती वळणे आहेत. सदरचे ठिकाण हे डार्क झोन मध्ये येण्याचा संभव आहे. सदर अपघाती वळणे दूर केल्यास प्राचीन मंदिरही जतन होऊ शकते. ओढ्यावर बांधलेला चुकीचा ब्रिज दुरुस्त होऊ शकतो. परंतु ग्रामस्थांच्या या मागणीचा विचार न करता संबंधित ठेकेदार व प्रकल्प संचालक कार्यालयातील अधिकारी दडपशाही करुन महामार्गाचे काम करत आहेत. ते वरिष्ठ कार्यालयाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत. भूसंपादनाचा मोबदला दिला नसताना तो दिला आहे,असे‌ सांगून दिशाभूल करीत आहेत. देवस्थान विश्वस्त नंदकुमार कदम यांचे विरुद्ध सरकारी कर्मचारी नसलेल्या एका २२ वर्षीय मुलांच्या वतीने कलम ३५३ चा खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या कामाचा अजब कारभाराचा फटका सामान्य नागरिकास बसत आहे. तीव्र स्वरूपाची अपघाती वळणे दूर न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने प्राधिकरण कार्यालयासमोर साखळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी बोलताना सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *