मोहोळ- विजापूर राष्ट्रीय मार्गावर घडला प्रकार
मोहोळ-विजापूर रस्त्यावरील मोहोळ शहर व कुरुल येथील दोन एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने कट करून एकूण ४९ लाख २७ हजार ५०० रुपयांची रोकड पळवून नेल्याची खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यात घडली असून यामध्ये मोहोळ शहरात असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरने कट करून अज्ञात चोरट्यांनी २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच कुरूल ता. मोहोळ येथील चौकामध्ये असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम मशीन चा गॅस कटरच्या सहाय्याने पत्रा कट करून आतील २२ लाख ९९ हजार रुपयांची रोखड अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना बुधवार दि.८ जून रोजी पहाटे ३ वाजून २२ मिनिटांनी घडली. दरम्यान वाहनांची रहदारी असलेल्या शहराच्या प्रमुख चौकात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मोहोळ शहरातील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा ही अयशस्वी प्रयत्न झाला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यात एटीएम फोडीच्या दोन घटना घडल्या असून यामध्ये मोहोळ- विजापूर राष्ट्रीय महामार्ग वर मोहोळ शहरात कुरुल रस्त्यानजीक भारतीय स्टेट बँकेचे पेट्रो कंपनीचे एटीएम मशीन आहे. दरम्यान बुधवार दि.८ जून रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशिन मध्ये प्रवेश करून समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावर हिरव्या रंगाचा कलर मारून कॅमेरा बंद केला. तसेच सोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा पत्रा कट करून एटीएम मशीन मधील ५०० रुपये दराच्या ४८७२ नोटा, १०० रुपये दराच्या १९२५ नोटा असा एकूण २६ लाख २८ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम व मशीनची सुमारे एक लाख ५० हजार रुपयांची तोडफोड असा एकूण २७ लाख ७७ हजार रुपये नुकसान केल्या बाबतची फिर्याद हिताची पेमेंट कंपनी चे चॅनल एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत असणारे किरण संजय लांडगे (वय-३०) रा. सैनिकनगर सोलापूर यांनी दिली असून यानुसार अज्ञात चोरटयाच्या विरोधामध्ये मोहोळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत कुरूल ता. मोहोळ येथील चौकामध्ये असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएम मशीन चा गॅस कटरच्या सहाय्याने पत्रा कट करून आतील २२ लाख ९९ हजार रुपयांची रोखड अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना बुधवार दि.८ जून रोजी पहाटे ३ वाजून २२ मिनिटांनी घडली.
याबाबत कामती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरुल चौकात बँक ऑफ इंडिया शाखेचे इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एटीएम मशीन आहे. दरम्यान दि.८ जून रोजी पहाटे ३ वाजून २२ मिनिटांनी अज्ञात चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करून समोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा वर कलर स्प्रे त्यानी मारुन कॅमेरा अदृश्य केला. तसेच गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीनचा पत्रा कट करून आतील २२ लाख ९९ हजार रुपयांची रोखड पळवून नेल्याची फिर्याद कंपनीचे रिजनल मॅनेजर अमोल पवार रा. बाळे यांनी दिली असून यानुसार कामती पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने हे करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून अतिरिक्त पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, मोहोळ चे पोलीस निरीक्षक अशोक सायकर, कामती चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान चोरट्यांचा माग काढण्यासाठी ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी कुरुल येथील एटीएम मशीन वरील चोरट्यांच्या ठसे घेतले आहेत.
दरम्यान मोहोळ शहरातीलच पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँके जवळील एटीएम मशीन फोडण्यासाठीही येथील सीसीटीव्ही कॅमेरा वर कलर स्प्रे मारण्यात आला. दरम्यान याठिकाणी कोणीतरी आल्याची चाहूल लागताच इथून त्यांनी काढता पाय घेतला.