पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मोहोळ /धुरंदर न्यूज
मोहोळ तालुक्यातील वेगवेगळ्या भागांमधून चोरीला गेलेल्या १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे ११ मोबाईल मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर लोकेशनच्या मदतीने जिल्ह्यासह पर राज्यातून जप्त केले आहेत.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसापासून मोहोळ तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून तसेच आठवडी बाजारांमधून मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डूनगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद डावरे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत, पोलीस कॉन्स्टेबल हरीश थोरात, सायबर विभागाचे धीरज काकडे यांनी मोबाईल लोकेशन च्या माध्यमातून तपासाला गती देत सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून तसेच परराज्यातूनही १ लाख ९७ हजार रुपये किमतीचे तब्बल ११ मोबाईल जप्त केले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन मोहोळ तालुक्यातील वेगवेगळ्या भागातून तसेच आठवडी बाजार, यात्रेमधून चोरलेले मोबाईल हे जिल्ह्यातील व परराज्यातील लोकांना, पैशाची गरज आहे, साहित्य चोरीला गेले आहे, गावाकडे जायला पैसे नाहीत म्हणून मोबाईल विकत असल्याचे सांगून ते मोबाईल विक्री केले होते. सायबर विभागाच्या मदतीने मोबाईल लोकेशन द्वारे मोबाईलचा शोध घेत गुन्हे शाखेने ते जप्त केले असून कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितांना ते मोबाईल परत केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. पोलिसांच्या या कामगिरीचे नागरीकांतून कौतुक होत आहे.