ट्रकवर पाठीमागुन चढत समोरील काचेवर ताडपत्री चा पडदा टाकून ट्रक उभा करून ड्रायव्हरला बंदूक व तलवारीचा धाक दाखवीत, बेदम मारहाण करून त्याचे हात-पाय बांधून उसात फेकून देत १२ टन स्टील सह ट्रक, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेलेला स्टीलसह ट्रक व एका चोरट्याला परंडा तालुक्यातील येणेगाव शिवारात अवघ्या २४ तासात पकडण्यात मोहोळ पोलीसांना यश आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोला तालुक्यातील नाझरा येथील प्रवीण अंबादास सरगर (वय-३५) यांनी ट्रकवर ड्रायव्हरची नोकरी करीत करीत नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः एम एच १० झेड १३५२ हा ट्रक विकत घेतला होता. दरम्यान दि.१ जून रोजी त्यानी जालना येथील आयकॉन कंपनीमधून ८ लाख ४० हजार रुपयांचे १२ टन स्टील घेऊन ते पुढे सांगली कडे निघाले होते. दरम्यान दि.४ जून रोजी पहाटे ५ वाजनेचे दरम्यान शेटफळ मार्गे पंढरपूर कडे जात असताना आष्टी गावाच्या शिवारात अचानक गाडीच्या पुढच्या बाजूच्या काचेवर ताडपत्री चा पडदा आडवा आला. पुढील काही दिसत नसल्याने त्यांनी गाडीला ब्रेक लावून गाडी थांबवली. ताडपत्री चा पडदा बाजूला सारण्यासाठी ड्रायव्हर खाली येताच, एक पांढर्या रंगाची इंडिका गाडी आली. त्यातून अनोळखी सहा इसमांनी उतरून ड्रायव्हरला रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतामध्ये नेऊन त्याच्या डोक्याला बंदूक लावली. तर तलवारीचा धाक दाखवून त्याच्या डोळ्याला काळी पट्टी व हात पाय बांधून त्याला बेदम मारहाण केली. व त्याला उसात टाकुन देऊन त्याच्या खिशातील २० हजार रूपये रोख रकमेसह, मोबाईल, ड्रॉयव्हर व गाडीची कागदपत्रे घेऊन जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले होते. या बाबत ट्रक ड्रायव्हर प्रवीण अंबादास सरगर यानी दिलेल्या फिर्यादी नुसार सहा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मोहोळ पोलीस ठाण्यातून रवाना झालेल्या पथकामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, शरद ढावरे, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, पांडुरंग जगताप व हरिदास थोरात या डीबी पथकाने परांडा, तेरखेडा, वाशी या परिसरात जाऊन गोपनीय माहिती घेतली असता सदरचा चोरून नेलेल्या ट्रक परंडा तालुक्यातील येनेगाव शिवारात असल्याचे समजल्याने हे पथक त्या ठिकाणी रवाना झाले असता ट्रक व स्टील आढळून आले. यावेळी एकजण संशयीत पोलिसांना सापडला असून इतर जण पळून गेले आहेत.
सदरची कामगारी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांचे मार्गदर्शना नुसार तपासी अधिकारी राजकुमार डुनगे, डिबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन माने, शरद ढावरे, प्रवीण साठे, सिद्धनाथ मोरे, पांडुरंग जगताप व हरिदास थोरात यांनी केली.