केवळ ५०० रुपयांची लाच स्वीकारताना शाखा अभियंत्यासह तिघांना रंगेहाथ पकडले…

मोहोळ तालुक्यातील हिंगणी निपाणी येथील समाज कल्याण विभागामार्फत पाणी पुरवठा पाईप लाईन करणे च्या कामास मंजुरी मिळालेली होती, त्या कामाचे अंदाजपत्रक लवकर तयार करून तांत्रिक मंजुरी मिळवून देण्यास मदत करण्यासाठी मोहोळच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागात शाखा अभियंत्यांनी कनिष्ठ सहाय्यक व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्यासाठी केवळ ५०० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती कार्यालयांमध्ये स्वीकारत असताना तिघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना दि.२३ जून रोजी घडली. यामध्ये शाखा अभियंता हेमंत राजाभाऊ विधाते, (वय-५० वर्षे), कनिष्ठ सहाय्यक सिद्रामप्पा मल्लीकार्जुन वैधकर (वय ४३ वर्षे), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गंगाधर हणमल्लु फुलानुवार, (वय ३३ वर्षे) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले असुन यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे वडिल मु. पो हिंगणी (नि) या गावचे सरपंच असुन तक्रारदार यांचे गावामध्ये पाणीटंचाई असल्याने त्यांचे गावाकरीता अनुसुचित जाती व नवबौध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे सन २०२१- २०२२ या योजनेअंतर्गत समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर यांचेकडुन पाणीपुरवठा पाईपलाईन करणे या कामास मंजुरी मिळालेली होती. सदर योजनेअंतर्गत मंजुर पाणीपुवठा पाईपलाईन करणेचे कामाचे अनुषंगाने तक्रारदार हे त्यांचे वडिलांचे वतीने पाठपुरावा करण्याकरीता तक्रारदार हे ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, उपविभाग मोहोळ येथे पाठपुराव्याकरीता गेले असता यातील शाखा अभियंता विधाते यांनी सदर कामाचे अंदाजपत्रक लवकर तयार करून तांत्रिक मंजुरी मिळवुन देण्यास मदत करण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक  वैधकर यांचेकरीता २०० रुपये व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक फुलानुवार यांचेकरीता ३०० रुपये लाचेची मागणी केली. यामध्ये वैधकर व फुलानुवार यांनी देखिल त्यास संमती दिली. विधाते याने वरील दोघांकरिता मागणी केलेली एकुण ५०० रुपये लाच रक्कम मोहोळ पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या त्यांच्या कार्यालयामध्ये स्विकारली असता यातील वरील तिघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले. व त्यांच्यावर मोहोळ  पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई लाचलुचपत विभागाचे प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे, घाडगे, सनके यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *