बनावट नवरी उभी करून लग्र लावणारी टोळी पकडली

मोहोळ तालुक्यातील प्रकार

बनावट नवरी दाखवून तिच्याशी साखरपुडा करून लग्न करण्यासाठी खंडोबाचीवाडी येथे आल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांना तिच्याबद्दल संशय आला आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नवरी सह सात जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना दि. २५ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या सात जणांना मोहोळ येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
खंडोबाचीवाडी (ता. मोहोळ) येथील बंडू महीपती नरके याने लग्न जमवण्यासाठी भोसे (करकंब) येथील एजंट युवराज विठ्ठल जमदाडे याच्याशी संपर्क करून मुलगी बघा असे सांगितले होते, त्यानुसार त्यांनी ॲडव्हान्स म्हणून पाच हजार रुपये तसेच लग्न जमवण्यासाठी सव्वा लाख रुपये व साखरपुडा झाला तर २० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले त्यावर नरके यांनी त्याला होकार दिला. त्यानुसार दि. १९ एप्रिल रोजी एजंट जमदाडे याने नरके यास फोन करून सांगितले की, दि. २० रोजी तुम्ही सोलापूर येथे मुलगी बघायला या, त्यावेळी नरके याने त्याला होकार दिला. व २० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान नरके व इतर तिघे असे एकूण चार जण मुलगी बघण्यासाठी सोलापूर येथील विजापूर रोडवर गेले. त्यावेळी एजंट जमदाडे याने त्या ठिकाणी आणखी एका दुसर्‍या महिला एजंटची ओळख करून दिली व आम्ही दोघे लग्नाची स्थळे जमविण्याचे एकत्र काम करतो असे सांगितले. त्या ठिकाणी मुलगी दाखवली व तिचे नाव स्वाती पवार असल्याचे सांगितले. तसेच तिचे आई-वडील मयत झाल्याचेही सांगितले व तुम्हाला जर मुलगी पसंत असेल तर याठिकाणी लगेच साखरपुडा करा असे सुचवले. त्यानुसार नरके याने मुलगी पसंत असल्याचे सांगत त्याच दिवशी त्याच ठिकाणी साखरपुडा केला व जमदाडे व त्याच्यासोबत असलेल्या महिलेला रोख १५ हजार रुपये दिले. तसेच २४ एप्रिल ही लग्नाची तारीख ठरवली. दरम्यान सोमवार दि. २४ एप्रिल रोजी दुपारी एक वाजला तरीही ठरल्याप्रमाणे मुलगी व तिचे नातेवाईक आले नाहीत म्हणून बंडू नरके याने जमदाडे याला फोन करून विचारपूस केली असता जमदाडे यांनी आमची गाडी बंद पडली असल्याचे सांगितले व आम्ही थोड्या वेळात त्या ठिकाणी पोहोचतो असे सांगितले. त्यानुसार दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान नवरी मुलगी व तिचे नातेवाईक मंडपात आले. त्यावेळी त्यातील महिला नातेवाईकांनी बारकाईने मुलीची पाहणी केली असता नवरीच्या पायात जोडव्याचे व्रण असल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांनी नवरीची आणखी चौकशी केल्यानंतर नवरीला मराठी भाषा येत नसल्याचे समजले. तेव्हा एजंट युवराज जमदाडे याने बनावट नवरी मुलगी दाखवून तिच्या सोबत साखरपुडा करून रोख १५ हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले. लग्नसमारंभासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी नवरी सायरा रफिक शेख रा. विडी घरकुल, सोलापूर तिचा भाऊ सरफराज सलीम शेख रा. कुमठा नाका सोलापूर, चैतन्य प्रल्हाद गायकवाड रा. शाहीर वस्ती भवानी पेठ सोलापूर, शिवगंगा चैतन्य गायकवाड रा.शाहीर वस्ती सोलापूर, शुभांगी सोमनाथ अधटराव रा. शिरापूर, महानंदा चिदानंद म्हेत्रे रा. विडी घरकुल सोलापूर व एजंट युवराज विठ्ठल जमदाडे अशा सात जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी भावी नवरदेव बंडू नरके यांच्या तक्रारीनुसार वरील सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून या संशयितांना मोहोळ येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन मुसळे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *