कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करूनही मुख्य रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल न करणाऱ्या मोहोळ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा २ सप्टेंबर रोजी मोहोळ नगर परिषदेस “टाळा ठोको” आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मोहोळ तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष दशरथ काळे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मोहोळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आठवडा बाजार या दरम्यान मुख्य रस्ता आहे. नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र त्यावर वारंवार खड्डे पडत आहेत. हा रस्ता नीटपणे दुरुस्त करावा आणि याचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या बारामतीचे ठेकेदार योगेश हिंगणे यांच्यावरती कारवाई करावी, या मागणीसाठी दशरथ काळे यांनी स्वातंत्र्यदिनी आंदोलन केले होते. त्याचा धसका घेऊन अवघ्या ५ दिवसात ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवू, असे पत्र मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांनी दिले, मात्र १२ दिवस उलटून सुद्धा पत्र दिले नाही. त्यामुळे आंदोलन कर्ते माजी तालुकाध्यक्ष दशरथ काळे आणि त्यांचे सहकारी यांची फसवणूक झाली म्हणून त्यांनी मुख्याधिकारी डॉ. डोके यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा २ सप्टेंबर रोजी नगरपरिषदेला “टाळा ठोको” आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान आंदोलनाचे पत्र मोहोळ पोलीस ठाण्यात दिल्यानंतर डोके यांच्या विषयी न बोलता उलट दशरथ काळे यांनाच तुमच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा केला म्हणून गुन्हा दाखल होईल, असे पोलिसांनी सांगितले. या गोष्टीमुळे मूळ मागणीकडे दुर्लक्ष करण्याच्या कृतीमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.