
शेतात मोटर चालू करून ऊसाला पाणी देण्यासाठी म्हणून गेलेल्या १८ वर्षीय नवनाथ दिनकर ढेरे या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना दि. १२ जून २०२१ रोजी मोहोळ तालुक्यातील बोपले येथे घडली होती. याप्रकरणी मृताचे वडील दिनकर ढेरे यांनी सदरची घटना ही घातपात असून माझ्या मुलाचा खून केला असल्याबाबतची खाजगी फिर्याद न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार मोहोळ येथील प्रथम वर्ग न्यायाधीश ऋषिकेश जाधव यांनी आरोपीच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश मोहोळ पोलिसांना दिले असुन या प्रकरणी राहुल संजय ढेरे वय-२४ वर्षे रा- गलंदवाडी ता. मोहोळ याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिनकर बिरा ढेरे रा. बोपले ता. मोहोळ हे आपल्या कुटुंबासह शेती करून उदरनिर्वाह करतात. दि. १२ जुन २०२१ रोजी सकाळी नऊ वाजता महावितरणची लाईट येते म्हणून नवनाथ ढेरे हा त्यांचा मुलगा शेतात मोटर चालू करून ऊसाला पाणी देण्यासाठी जातो म्हणून घरातून बाहेर पडला. बराच कालावधी झाल्यानंतरही मुलाचा शेतात पोहोचलो असा फोन न आल्याने दिनकर ढेरे हे काय झाले आहे? बघण्यासाठी शेतात गेले. शेतात सर्वत्र शोधाशोध करूनही मुलगा सापडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर नदीवरून पाईपलाईन जोडलेल्या पॅनल बोर्ड जवळ गेले असता तो खाली पडलेला दिसला. त्यावेळी दिनकर ढेरे यांनी नवनाथ ढेरे याला तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत मोहोळ पोलिसात नोंद करण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ ढेरे याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद करून प्रकरण निकाली काढले होते. मात्र मुलाचा मृत्यू हा अकस्मात नसून हत्तेचा कट रचून विजेचा धक्का देऊन त्याचा खून करण्यात आला असल्याबाबत वडील दिनकर ढेरे यांनी वरिष्ठ पोलिसांकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता, परंतु पोलिसांनी काहीच दाद न दिल्याने त्यांनी ॲड. प्रशांत नवगिरे यांचेमार्फत मोहोळ येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली होती.

या फिर्यादीत ॲड. प्रशांत नवगिरे यांनी आरोपी राहुल संजय ढेरे हा फिर्यादी दिनकर बिरा ढेरे यांचा पुतण्या आहे. सन २०१९ सालापासून फिर्यादी व आरोपी मध्ये जमिनीच्या वाटणीबाबत वाद चालू होता. त्यामुळे बऱ्याच वेळा आरोपी व त्याचे वडिलांनी फिर्यादी व त्याचे मुलास जीवे मारण्याची धमकी दिली होती.फिर्यादीचे शेतामध्ये बांधावर एक विद्युत पोल आहे . व त्यास दोन विद्युत मीटर कनेक्शन होते. आरोपीने दि. १२ .६ .२०२१ रोजी उघड्या असलेल्या मीटर पेटीतून पाठीमागे असलेल्या लोखंडी मीटर पेटीस वायरीने विद्युत कनेक्शन देऊन ती पेटी विद्युत प्रवाहने भारित केली. सदर दिवशी फिर्यादीचा मुलगा नवनाथ ढेरे हा सकाळी पिकांना पाणी देणेकरिता गेला, त्यावेळी सदर लोखंडी पेटीस हात लावता क्षणीच त्यास विजेचा जोराचा धक्का बसून तो जागीच मयत झाला. या प्रकारे योजनाबद्धरित्या कट आखून आरोपी राहुल ढेरे याने फिर्यादीचा मुलगा नवनाथ ढेरे याची हत्या घडवून आणली असल्याची बाजु न्यायालयासमोर मांडली. व या सर्व संशयित बाबी पोलीस तपासाशिवाय शक्य नसल्याचे न्यायालयासमोर मांडले. फिर्यादीच्या वकिलांचा युक्तिवाद व सादर केलेले सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ऋषिकेश जाधव यांनी आरोपी राहुल संजय ढेरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश मोहोळ पोलिसांना दिले.
त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी मोहोळ पोलीस ठाण्यात राहुल संजय ढेरे याच्या विरुद्ध भा.द.वी. ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून यात फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे , ॲड. अमोल देशपांडे (मोहोळ ) व ॲड. श्रीपाद देशक यांनी काम पाहिले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड करीत आहेत.