दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी लागणाऱ्या गुळ, पेंड, सरकी, भरडा, सुग्रास याचे भाव गगनाला भिडले आहेत, मात्र राज्यातील दुधाचे दर कमी असल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे दुधाला प्रति लिटर ३८ रुपये दर द्यावा, यासह अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, तसेच मोहोळ तालुक्यातील प्रलंबित असलेल्या योजनांना निधी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून केली आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सासवड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे विविध मागण्या केल्या असून यामध्ये शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी खाद्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचे दर वाढले आहेत, तर दुधापासून तयार होणाऱ्या उप पदार्थाचे ही दर वाढलेले आहेत, मात्र दुधाचे दर हे कमी झालेले आहेत, गेल्या महिन्यात प्रति लिटर दुधाला ३८ रुपये भाव असताना तो ३० रुपये पर्यंत आला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर ३८ रुपये दर देऊन शेतकऱ्यांवर होणारा अन्याय दूर करावा, यासह सोलापूर जिल्ह्यासह राज्यांमध्ये अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून हेक्टरी ५० हजार तर फळबागांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, यासह मोहोळ तालुक्यातील सीना भोगातील जोड कालव्याला त्वरित मंजुरी देऊन या भागातील ४० ते ५० गावातील शेतकऱ्यांचे क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी मदत करावी, तसेच आष्टी उपसा सिंचन योजनेजवळ अर्धा किमी अंतरावर असणाऱ्या हिवरे तसेच वडाचीवाडी, चिखली, यावली या गावांना सर्वे करून पाणी उपलब्ध करून या भागातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवावा, यासह उपसा सिंचन योजनेचे अर्धवट काम त्वरित चालू करून कोन्हेरी, पेनुर, पाटकुल या गावातील शेतकऱ्यांच्या संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला खात्यावर त्वरित जमा करावा, यासह सिना-माढा सिंचन योजनेमधून वाफळे परिसराला पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष नानासाहेब मोरे, कार्याध्यक्ष चंद्रकांत निकम, महेश बिस्किटे, गणेश डोंगरे, बारीकराव काळे, सचिन मोटे, उत्तरेश्वर आतकरे, शिवानंद लामगुडे, सुबोध मोटे, तानाजी मोटे आदिसह विविध शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.