मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर पेनूर येथे हृदय हेलवणारी घडली होती घटना
पेनूर (ता. मोहोळ) येथे दि.२२ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मोहोळ शहरातील खान व आतार कुटुंबियातील ६ जण मृत्यू झाल्याची हृदय हेलावणारी घटना झाली होती. दरम्यान दि.२२ रोजी संध्याकाळी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर खान कुटुंबियातील तिघांवर मोहोळ शहरातील मुस्लिम दफनभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर डॉक्टर आत्तार दांपत्यावर त्यांच्या मूळ गावी जयसिंगपूर येथे दि.२३ मे रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तीनच दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील आपले मेहुणे डॉक्टर डॉ. मुजाहीद इमाम आत्तार यांच्याकडे इरफान खान हे आपली पत्नी बेंजीर इरफान खान, मुलगी इनाया इरफान खान, बहीन डॉ. अफरीन आतार यांचे सह परिवारा समवेत गेले होते. दोन दिवसाचा पाहुणचार घेऊन दि.२२ रोजी ही सर्व फॅमिली मोहोळ कडे रवाना झाली होती. दिवसभर कोल्हापुरात फेरफटका मारून दुपारी अचानक पेनुर गावाजवळ घराच्या जवळ येऊन या परिवारावर काळाने घाला घातला. स्कॉर्पिओ गाडी ने समोरासमोर धडक दिल्याने खान व आतार परिवारातील या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान दि.२२ मे रोजी रात्री मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर इरफान नूरखान खान (वय ४०), बेनजीर इरफान खान (वय ३७), इनाया इरफान खान (वय-२ वर्ष) यांच्यावर मोहोळ येथील मुस्लिम दफनभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर
डॉ. मुजाहिद इमाम आत्तार (वय ३१), डॉ.आफ्रीन मुजाहिद आत्तार (वय २७), अराफत मुजाहिद आत्तार (वय १०) यांच्यावर दि.२३ मे रोजी त्यांच्या मूळ गावी जयसिंगपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींसह अनेकांनी भेट देऊन हळहळ व्यक्त केली. अनेक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली होती.
या घटनेमुळे मोहोळ शहरामध्ये शोककळा पसरली होती. त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेताना आणि कार्याला उजाळा देताना सर्वांच्याच डोळयांच्या कडा ओलावल्या होत्या. वैद्यकीय क्षेत्रात कोरोना काळात खमकेपणाने लढणाऱ्या आतार यांना अभिवादन करताना अनेकांच्या भावना दाटून आल्या. कुटुंबातील आधारवड हरपला अशा शब्दांत परिवारातील सदस्यांनी अश्रूंना मोकळी वाट करुन दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात मोहोळमध्ये सरदारबी खान यांनी घरगुती वैद्यकीय सेवा सुरू केली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पिढी मधील डॉक्टर सैफन खान, त्यांची तिसरी पिढी मधील नूरखान खान व चौथ्या पिढीमधील या अपघातामध्ये मयत झालेले इरफान खान आहेत.
मयत इरफान खान यांचे वाडिल डॉक्टर नुरखान खान यांना दोन मुले व एक मुलगी असून मुलगा इरफान खान हा पुणे येथील आयटी पार्क मध्ये काम करत होता. तर मुलगी आफरीन आतार बी ए एम एस चे शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवा सुरू केली होती. तर तिचे पती जयसिंगपूर येथील बी.ए.एम.एस डॉ. मुजाहीद आतार यांच्याशी सात वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. डॉक्टर आफरीन खान यांना एक मुलगा होता. तर इरफान खान यांना एक मुलगा व एक मुलगी होती.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये नाम मिळविलेल्या या खान परिवारामध्ये आजमितीला एकूण १९ डॉक्टर वैद्यकीय सेवा देतात तर अन्य इतर व्यवसाय मध्ये काम करीत असून या परिवारामध्ये ५० हुन अधिक जणांचा समावेश आहे. मोहळ शहरासह तालुक्यात व पंचक्रोशीमध्ये या परिवारचा एक वेगळा नावलौकिक आहे.