भीम टायगरसेनेचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा…
मोहोळ/धुरंदर न्यूज
मोहोळच्या रिक्त झालेल्या जागी तहसिलदार म्हणुन शोभाताई पुजारी यांची नियुक्ती शासनाने केली आहे. मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या दबावामुळे त्यांना अद्याप पदभार घेता आलेला नाही. त्यामुळे पुजारी यांना मोहोळच्या तहसिलदारपदी तत्काळ रुजू करुन घ्यावे अन्यथा १० ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष लखन घाटे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
भीम टायगर सेनेचे तालुकाध्यक्ष लखन घाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
मोहोळचे तहसिलदार प्रशांत बेडसे यांची बदली झाल्याने मोहोळचा प्रशासकीय कारभार प्रभारी तहसिलदार म्हणून नायब तहसिलदार भालचंद्र यादव हे पाहत आहेत. दरम्यान शासनाने मोहोळच्या रिक्त जागी शोभाताई पुजारी यांची तहसिलदार म्हणून नियुक्ती केली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपासून त्यांना पदभार घेता आलेला नाही. पूर्णवेळे तहसिलदार नसल्यामुळे मोहोळ शहर व तालुक्यातील सामान्य शेतकरी व कामगारवर्ग यांच्या अडचणी व मुलभुत प्रश्न सोडवणे अडचणीचे बनले आहे.
जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी मोहोळ तालुक्यातील जन भावनेचा आदर करुन शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. तसेच तहसिलदार शोभाताई पुजारी यांना मोहोळचा पदभार घेण्याचे आदेश द्यावा. अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० ऑगस्ट रोजी आंदोलन करण्याचा इशारा तालुकाध्यक्ष लखन घाटे यांनी दिला आहे.