मोहोळ/धुरंधर न्युज
महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, यासह आंदोलकावर केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, गेल्या अनेक महिन्यापासून भाजपाचे नेते हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर वादग्रस्त विधान करत आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेताल वक्तव्याचा तर निषेध करावा तेवढा कमी असून या वक्तव्याने आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावले गेल्या आहेत. यासह निषेध व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यावर अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले जात आहेत, परिणामी राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार व प्रदेशाध्यक्ष विनोद भोळे यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया पॅंथर सेना जाहीर निषेध करत असून मंत्री चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करून आंदोलकावर दाखल केलेले सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनावर मोहोळ तालुकाध्यक्ष राजन सिरसट, महिला तालुकाध्यक्ष वैशाली बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल शिरसट, जिल्हा उपाध्यक्ष शोभाताई ससाने, मोहोळ शहराध्यक्ष सुनीताताई धोत्रे, तालुका सल्लागार बाबुराव सोनवणे आदींच्या सह्या आहेत.