स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य
७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मोहोळ येथे नऊ वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या तिरंगा डिफेन्स अकॅडमीच्या वतीने भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करत असलेल्या दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सैन्य व पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण आणि अभ्यासिका यांचा शुभारंभ मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतापसिंह गरड हे होते. यावेळी माजी नगरसेविका सीमाताई पाटील, उद्योजक वैभवबापू गुंड, नगरसेवक सत्यवान देशमुख, डॉ.सुधाकर गायकवाड, संभाजी चव्हाण, दिग्दर्शक अभिजीत बनसोडे, अरुण भोसले, आबासाहेब गावडे, सागर गायकवाड, ताजुद्दीन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सीमाताई पाटील म्हणाल्या की, “सर्वजण आज नोकरी मिळवण्यासाठी धडपड करतोय परंतु तुकाराम माने सारखा तरुण त्यांच्याकडे असलेल्या नोकरीचा राजीनामा देऊन तिरंगा अकॅडमीची स्थापना करून एक हजार तरुण-तरुणींना नोकरी मिळवून देण्याचे उच्च ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी मोफत प्रशिक्षणाचे कार्य करतोय हीच अभिमानाची बाब आहे. युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी चालू ठेवलेले कार्य हीच खरी देशसेवा आणि तुकाराम माने सारखा सामाजिक हित जोपासणारा युवक हाच खरा देशभक्त असल्याचे गौरवोद्गार काढून आवश्यकता भासेल तिथे सर्वतोपरी सहाय्य करण्याचेही सीमाताई पाटील यांनी आश्वासन दिले.
यावेळी तिरंगा परिवाराचे तात्या मोरे, इंडियन रेल्वे, ज्योती माने, महेश लादे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय ढेरे, प्रा. पंडित माने, मानाजी चवरे, सागर माने, सिद्धेश्वर दळवे, श्रीकृष्ण कोळेकर, शशिकांत बंडगर,सोनाली वाघमोडे, पायल पाटोळे, निकिता जाधव, संगीता चौधरी, धनश्री माने, नम्रता सुरवसे यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समाधान गवळी यांनी तर आभार प्रा. भाऊसाहेब जाधव यांनी मानले.