तहसीलदारांचे आवाहन
महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना २०१३ ची अंमलबजावणी ०१ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू करण्यात आली आहे. या योजनोमध्ये शिधापत्रिकाच्या आधार सिडींगच्या आधारे सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ घेण्याकरीता लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पात्र लाभार्थ्यामधील ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य घेण्याच्या योजनेमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शविली आहे, अशा लाभार्थ्यांना मिळणारा लाभ, जे गरजू लाभार्थी इष्टांकाच्या मर्यादेमुळे योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकले नाहीत, अशा लाभार्थ्यांना मिळेल यादृष्टीने “अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पड़ा ” अशी योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वइच्छेने पुढे येऊन या योजनेतून बाहेर पडावे, असे आवाहन मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना २०१३ अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने मिळणा-या अन्नधान्याचा लाभ घ्यावयाचा नसल्यास व देशास बळकट करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग व्हायचा असल्यास त्यांनी नव्याने घ्यावयाचा शिधापत्रिका आणि अस्तित्वात असलेल्या शिधापत्रिकां करिता शासनाकडील नमुन्यातील मध्ये आपली संमती दर्शवून संबंधीत रास्तभाव परवानाधारक यांचेकडे सादर करावयाचा आहे. त्याअनुषंगाने मोहोळ तालुक्यातील सर्व रास्तभाव परवानाधारक यांचेकडे अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा, याबाबतचे विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
यानुसार मोहोळ तालुक्यातील अन्नसुरक्षा योजनोतील सर्व लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य घेण्याची आवश्यकता नाही, अशा लाभार्थ्यांनी स्वेच्छेने अन्नधान्य घेण्याच्या योजनेमधून बाहेर पडावे व तसे संमतीदर्शक अर्ज आपल्या गावातील रास्तभाव परवानाधारक यांचेकडे जमा करावेत. यामध्ये सरकारी, निमसरकारी नोकरदार, पेन्शधारक, व्यावसायीक बगर शेतकरी, चारचाकी वाहनधारक आयकर भरणारे लाभार्थी, तसचे ज्या लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रू.४४०००/- व शहरी भागात रू.५९०००/- पेक्षा जास्त आहे, यांचा समावेश आहे. शासन स्तरावरून भविष्यात या योजनोचा आढावा घेण्यात येणार असून अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगने जे अपात्र लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेमध्ये आढळून येणार आहेत, त्यांचेवर कारवाई करण्यात येणार आहे. तेव्हा अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा, या योजनेंतर्गत आपला संमतीदर्शक अर्ज तात्काळ देवून सदर योजनेतून बाहेर पडावे असे आवाहन तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी केले आहे.
मोहोळ तालुक्यातील शंकर बजीरंग कोळी रा. लांबोटी, बबन तात्या भालेराव व श्रीमती शामल गोवर्धन फंड रा अंकोली, श्री नामदेव श्रीपती कोरे रा मोहोळ यांनी अन्नधान्याच्या योजनेतून बाहेर पडा, योजनेंतर्गत त्यांचे संमतीदर्शक अर्ज तहसिल कार्यालयास जमा केले आहेत. या लोकांचा आदर्श घेवून, ज्या लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याची आवश्यकता नाही, त्यांनी स्वतःहून पुढाकार घेवून या योजनेतून बाहेर पडावे असेही यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी सांगितले.