ट्रकसह स्टील असा एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला
जालन्याहून सांगलीकडे आयकॉन कंपनीचे स्टील घेऊन निघालेला ट्रकवर पाठीमागुन चढत समोरील काचेवर ताडपत्री चा पडदा टाकून ट्रक उभा करून ड्रायव्हरला बंदूक व तलवारीचा धाक दाखवीत, बेदम मारहाण करून त्याचे हात-पाय बांधून उसात फेकून दिले. यासह १२ टन स्टील सह ट्रक, रोख रक्कम असा एकूण १३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात सहा चोरट्यानी चोरून नेल्याची घटना दि.४ जून रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील आष्टी शिवारामध्ये घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील नाझरा येथील प्रवीण अंबादास सरगर (वय-३५) यांनी ट्रकवर ड्रायव्हरची नोकरी करीत करीत नुकताच पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः एम एच १० झेड १३५२ हा ट्रक विकत घेतला होता. दरम्यान दि.१ जून त्याने जालना येथील आयकॉन कंपनीमधून ८ लाख ४० हजार रुपयांचे १२ टन स्टील घेऊन ते पुढे सांगली कडे निघाले होते. दरम्यान दि.४ जून रोजी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान शेटफळ मार्गे पंढरपूर कडे जात असताना आष्टी गावाच्या शिवारात अचानक गाडीच्या पुढच्या बाजूच्या काचेवर ताडपत्री चा पडदा आडवा आला. पुढील काही दिसत नसल्याने त्यांनी गाडीला ब्रेक लावून गाडी थांबवली. ताडपत्री चा पडदा बाजूला सारण्यासाठी ड्रायव्हर खाली येताच, एक पांढर्या रंगाची इंडिका गाडी आली. त्यातून अनोळखी सहा इसमांनी उतरून ड्रायव्हरला रस्त्याच्या बाजूला असलेल्या उसाच्या शेतामध्ये नेऊन त्याच्या डोक्याला बंदूक लावली. तर तलवारीचा धाक दाखवून त्याच्या डोळ्याला काळी पट्टी व हात पाय बांधून त्याला बेदम मारहाण केली. व त्याला उसात टाकुन देऊन त्याच्या खिशातील २० हजार रूपये रोख रकमेसह, मोबाईल, ड्रॉयव्हर व गाडीची कागदपत्रे घेऊन जीवे मारण्याची धमकी देत निघून गेले. काही वेळाने ड्रायव्हरने प्रयत्न करून पायाची दोरी सोडली व रस्त्यावर आला असता, त्याच्या आतील १२ टन सह ट्रक चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मोहोळ पोलिस स्टेशन गाठून अज्ञात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली असून त्यानुसार मोहोळ पोलिसांनी कंपनीमधून ८ लाख ४० हजार रुपयांचे १२ टन स्टील, ५ लाख रुपयांची ट्रक व चालकाच्या खिशातील २० हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल असा एकूण १३ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्या प्रकरणी सहा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुनगे हे करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्या अनुषंगाने या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात तात्काळ दोन पोलिस पथके व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रवाना करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.