बेजबाबदारपणे खोटा खुलासा करून वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्त्यांवर बेजबाबदार आरोप करून बदनाम करणाऱ्या मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा दि.१३ मे रोजी पंढरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांनी दिला आहे.
याबाबत क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दशरथ काळे यांनी पंढरपूर येथील प्रांत कार्यालयांमधील नायब तहसीलदार ए. एस तोंडसे यांना प्रत्यक्ष भेटून दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, दि. २४ सप्टेंबर २०२१ रोजी मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार राजन पाटील यांची तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी बेकायदेशीर पणे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतल्याबद्दल तहसीलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबद्दल तक्रारी निवेदन दिले होते. यासह दि.१ ऑक्टोबर २०२१ रोजी तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्या कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तसेच कार्यालयातच त्यांचा आदेश पायदळी तुडवलेबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्वयंस्पष्ट, स्वच्छ भावनेने, कोणताही वैयक्तिक आकस न ठेवता, समाज हितासाठी, फोटो पुराव्यासह तक्रारी अर्ज दिले होते. परंतु सात महिने उलटून गेले तरीही जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र पाठवण्या शिवाय कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. वरील दोन्ही विषयांवर मोहोळच्या तहसीलदारांनी सात महिन्यांनंतर खुलासा दिला आहे, सदरील खुलासा वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा व असमाधानकारक असून तक्रारदार यांच्यावर चुकीचे, बेजबाबदार आरोप करून, वरिष्ठांची सहानुभूती मिळवण्याचा व मूळ विषयापासून भरकटवण्यासाठी चुकीचा व खोटा खुलासा सादर केला आहे. तसेच सर्व सामान्यांच्या समस्यांवर आवाज उठवणार्या सामाजिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचून तहसीलदार हे मूळ कारवाईपासून वाचण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, तरी बेजबाबदार, खोटा खुलासा करून, वरिष्ठांची दिशाभूल करणाऱ्या व सामाजिक कार्यकर्त्यांवर बेजबाबदार आरोप करून बदनाम करणाऱ्या मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा दि.१३ मे रोजी पंढरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर कोणत्याही स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्रांतिवीर भगतसिंग युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष क्रांती दशरथ काळे यांनी दिला आहे.
सदरची निवेदने राज्यपाल, मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, महसूल विभाग यांना पाठवण्यात आली आहेत.
निवेदन देताना महादेव खिलारे, बादलसिंह ठाकूर, नितीन करंडे, आण्णा धोत्रे, संजय पालकर, बंडू रणदिवे, लाला माने, गौरव वाडेकर उपस्थित होते.