जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यावर रमेश बारसकर कडाडले..
लोकनेते बाबुराव चाकोते व गंगाधर घोडके सरकार यांनी दळलेल्या आयत्या पिठावर रेगुट्या वढणाऱ्यांनी आम्हाला निष्ठा व पश्चातापाची भाषा बोलू नये, पळून जायचे तर आधीच ठरले आहे, मात्र निमित्त शेजाऱ्याचे सांगणे, हे कितपत योग्य आहे, असा टोला जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना लगावत गेल्या तीन वर्षात जिल्हाध्यक्ष झाल्यापासून पक्षाची कार्यकारणी तर निवडली आहे का?, असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच्यासाठी सक्षम असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी चे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी सांगितले.
अनगर (ता. मोहोळ) येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे राष्ट्रवादी काँग्रेसला घरचा आहेर देत वेळीच सावध व्हा, अन्यथा पक्षश्रेष्ठींना पश्चातापाची वेळ येईल, असे भाष्य केले होते. यावर पत्रकारांशी बोलताना ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर म्हणाले की, पळून जायचे तर आधीच ठरले आहे, मात्र निमित्त शेजाऱ्याचे सांगणे चुकीचे आहे. अशा अध्यक्षांनी निष्ठा व पश्चातापाची वेळ येईल, असे म्हणणे कितपत योग्य आहे लोकनेते बाबुराव अण्णा चाकोते व गंगाधर घोडके सरकार यांच्या आयत्या पिठावर रेगुट्या वढनाऱ्यांनी तसेच तालुक्यात पक्षाच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी पक्षाला निष्ठा शिकवू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यासाठी सक्षम असल्याचे ही रमेश बारसकर यांनी सांगितले.
बळीराम साठे यांना जिल्हाध्यक्ष पद मिळून तीन वर्षे झाली तरी यांना जिल्हा कार्यकारणी सुद्धा निवडता आली नसल्याचे सांगून ज्या पक्षात यांना पदे मिळाली, त्याच पक्षाला निष्ठा व पश्चातापाची भाषा शिकवणे हे योग्य नसून जिल्ह्यामध्ये अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून गेले तरी पक्षाला काही फरक पडला नाही. जे बाहेर जातील ते संपतील, पक्ष म्हणजे एक रस्ता असतो आणि नेते हे वाटसरू असतात, त्यामुळे वाटसरू गेले म्हणून पक्ष व रस्ता कधीच संपत नसतो, असेही यावेळी रमेश बारसकर यांनी सांगितले.