एटीएम फोडणाऱ्या तालुक्यातीलच दोन चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मोहोळ शहरातील कुरुल रस्त्यावर पाच दिवसांपूर्वी भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सेंटर मधील मशीनवर दगड घालून मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालुक्यातीलच सौंदणे येथील दोघांना मोहोळ पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दि.२ ऑगस्ट रोजी पहाटे ताब्यात घेतले. दरम्यान या अटकेमुळे आणखी एटीएम फोडीच्या घटना उघड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ ते कुरूल रस्त्यावरील मुख्य चौकातील भारतीय स्टेट बँकेच्या ए.टी.एम.ची मशीन दगड घालून फोडून लुट करण्याचा अयशस्वी प्रयत्न दोन चोरट्यांनी शनिवार दि. ३० जुलै रोजी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान केला होता. सेंसर मुळे नियंत्रण कक्षाला व तिथून मोहोळ पोलिसांच्या रात्रगस्तल पथकाला माहिती मिळाल्यामुळे चोरटे पळून गेले होते. याबाबत भारतीय स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ.शरद ढावरे, पो.कॉ. पांडुरंग जगताप, हरीश थोरात यांचे पथक नेमले. त्यानुसार गुन्हा घडल्याच्या तारखेपासून सोलापूर शहर, इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय माहिती काढून गुन्हे शाखेचे पथक संशयित आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान दि. २ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वा. सुमारास बातमीदाराने बातमी दिली की, सी.सी.टी.व्ही. फुटेज मधील व्यक्ती सौंदणे येथील आहेत. परत गुन्हे शाखेच्या पथकाने सौंदणे येथे सापळा लावून गणेश अनभुले याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता पहिल्यांदा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले.

मात्र पोलिसांनी अधिक चौकशी करताच त्याने पांडुरंग डुणे याच्यासोबत ए.टी.एम. फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी डुणेलाही पकडले. गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने मोहोळ शहरासह, कुरुल येथील ए.टी.एम. सेंटरवर चोरट्यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपूते, अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक सायकर व गुन्हे शाखेच्या पथकातील पो.हे.कॉ.शरद ढावरे, पो.कॉ. पांडुरंग जगताप, हरीश थोरात यांनी केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे करीत आहेत.

गेल्या दोन महिन्यात एटीएम फोडीच्या घटना वाढल्या होत्या, त्या दृष्टीने तपासात गती देऊन दोघांना ताब्यात घेतले असून घेतल्यानंतर त्यांच्याकडून दोन चोरी केलेल्या मोटरसायकली ही हस्तगत केल्या आहेत. तसेच त्यांचा आणखी गुन्ह्यात सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी सांगितले.

https://youtu.be/ugpfqbgwdqQ

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *