पंचायत समिती शिक्षण विभाग, मोहोळ यांचा उपक्रम
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उत्कृष्ट संकल्पना- आ. यशवंत माने
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये ‘एक सायकल बहिणीसाठी’ भेट हा सुरू केलेला उपक्रम ही त्यांची उत्कृष्ट संकल्पना आहे. यामुळे विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा मिळेल, असे उद्गार मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत तात्या माने यांनी केले.
पंचायत समिती शिक्षण विभागाच्या मोहोळ येथे एक सायकल बहिणीसाठी भेट हा कार्यक्रम आ.यशवंत माने यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी युवा नेते अजिंक्यराणा पाटील, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, गटशिक्षणाधिकारी मल्लिनाथ स्वामी, शिक्षणविस्तार अधिकारी विकास यादव, केंद्रप्रमुख आप्पासाहेब देशमुख, शिक्षक नेते रणजीत थिटे, निवृत्त शिक्षक रमेश आदलिंगे, राजाराम बाबर आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी आमदार यशवंत माने व अजिंक्यराणा पाटील यांच्या हस्ते विद्यार्थिनींना १५ सायकलींचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना आमदार माने म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुरू केलेले या उपक्रमाला जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध गावातील दाते यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. भविष्यातही मोहोळ तालुक्यातून सर्व दात्यांनी पुढाकार घेऊन एक सायकल बहिणीसाठी भेट या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यींनीना भविष्य उज्वल करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मोहोळ तालुक्याचे आ.यशवंत माने यांनी केले आहे.
या उपक्रमामध्ये मुख्य लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने ५, शिक्षण विभाग मोहोळच्या वतीने ४, उप अभियंता बांधकाम विभाग मोहोळच्या वतीने २, प्राथमिक आरोग्य केंद्र बेगमपूर व कुरुल यांच्यावतीने प्रत्येकी १, रमेश आदलिंगे यांच्या वतीने १ व आप्पासाहेब देशमुख यांच्या वतीने १ अशा १५ सायकलींचे वाटप करण्यात आले. यापूर्वीही मोहोळ तालुक्यात माध्यमिक प्रशाला वडवळ, इंदिरा कन्या प्रशाला मोहोळ, कामती बुद्रुक या गावात तसेच जिल्हा परिषद शाळा पेनुर व शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय अनगर या शाळांमधील विद्यार्थिनींना एकूण १०५ सायकलींचे वाटप करण्यात आलेले आहे. एक सायकल बहिणीसाठी भेट या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.