डोळ्यात चटणी टाकून हॉटेल मालकाला लुटले, पैशाची बॅग केली गायब….


हॉटेल व्यवसायीकाच्या डोळ्यात चटणी टाकून, मारहाण करुन दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग अज्ञान चोरट्यांनी लंपास केली. हि घटना ५ जून रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या दरम्यान मोहोळ शहरातील नरखेड रोड उड्डाणपुलाखाली घडली. विश्वराज विकास भोसले ३० वर्षे, (रा. मोहोळ) असे लूट झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. मोहोळ पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विश्वराज भोसले यांचे सोलापूर पुणे महामार्गावरील मोहोळ ते नरखेड जाणाऱ्या पुला जवळ शिवराज नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री बारा वाजता भोसले हे नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करून दिवसभर व्यवसायाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम रुपये ३९ हजार रुपये असलेली बॅग व चाव्यांचा जुडगा घेऊन मोटरसायकलने (एम.एच. १३ सी.झेड २९६) नरखेड रोड उड्डाण पुलाखालून सर्विस रस्त्याने मोहोळ कडे जात होते. ५जून रोजी रात्री १ वाजता अचानक एका मोटरसायकल वरून तीघे जण आले, त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले होते. त्यांनी भोसले यांच्या मोटरसायकलीला त्यांची मोटरसायकल आडवी लावली. त्यापैकी एकाने भोसले यांच्या डोळ्यात व अंगावर चटणी टाकली. त्यामुळे भोसले खाली पडले. यावेळी त्या तिघांनी भोसले यांना बेदम मारहाण सुरू केली व खिसे चाचपुन दुचाकीला अडकवलेली पैशाची बॅग घेऊन पसार झाले. यावेळी चोरट्यांनी बॅगेतील चाव्यांचा जुडगा रस्त्यावर फेकून दिला. डोळ्यात चटणी गेल्यामुळे भोसले आरडाओरड करू लागले. यावेळी जवळून चारचाकी मधून जात असलेले उदय गायकवाड, चेतन गायकवाड, निलेश गायकवाड यांनी भोसले यांना काय झाले असे विचारल्यानंतर त्यांनी घडले प्रकाराबाबत त्यांना माहिती दिली. त्यामुळे तातडीने त्यांनी भोसले यांना मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


या प्रकरणी विश्वराज भोसले यांनी मोहोळ पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार तिघा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर खारगे हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *