एका अल्पवयीन सह चार जणांवर गुन्हा दाखल
मोहोळ/धुरंधर न्यूज
दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चार जणांनी लोखंडी सळई व काठीने वस्तीवर झोपलेल्या दोघांना मारहाण करून गंभीर जखमी करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. १० जुन रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील वाळूज गावच्या हद्दीत घडली होती. यातील जखमी लहु दिना मोटे यांचा दि. २२ रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह इतर तीन जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर कुबेर मोटे व त्यांचे चुलते लहू दिना मोटे (वय -७८) दोघे रा. वाळूज हे वस्तीवर झोपले असता रामेश्वर निवृती मोटे, विक्रम दाजी मोटे, गहिणीनाथ दत्तात्रय मोटे, व एक अल्पवयीन मुलगा अशा चार जणांनी मिळून दि. १० जून रोजी पहाटे दोन वाजण्याच्या दरम्यान झोपेत असताना काठी व सळईने डोक्यात व इतर ठिकाणी मारहाण करुन गंभीर जखमी केले होते, त्याबाबत किशोर कुबेर मोटे यांनी फिर्याद दिल्याने वरील चार जणांवर खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जखमी लहू मोटे हे घटना घडल्यापासून सोलापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते उपचारादरम्यान त्यांचा दि. २२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये खुनाचे कलम वाढविण्यात आले असून यातील तीन संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत तर एक अल्पवयीन मुलगा असल्यामुळे त्याला बालन्यायालय सोलापूर येथे हजर करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले होते. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेहबूब शेख करीत आहेत.